‘आई, मी नक्कीच परत येईन…’ संजय राऊतांचे आईला भावनिक पत्र

0
19

मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आपल्या आईला एक भावनिक पत्र लिहिले आहे.

गेल्या १ ऑगस्टला पत्राचाळ प्रकरणानंतर संजय राऊतांच्या घरावर ईडीने धड मारली होती. त्यानंतर चौकशीनंतर त्यांना अटक करून ईडीची कोठडी सुनावली होती. त्यावेळी हे भावनिक पत्र राऊतांनी आपल्या आईला लिहिले आहे. राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यापूर्वी ८ ऑगस्ट रोजी न्यायालयाबाहेरील बाकड्यावर बसून त्यांनी हे पत्र लिहिलेले आहे. त्यांचे हे पत्र आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे.

राऊत यांनी नेमके काय लिहिले पत्रात ?

संजय राऊत यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात त्यांनी सुरुवातीला खूप वर्षांनी मला पत्र लिहिण्याचा योग आला आहे, असे म्हणत केंद्र सरकारने मला पत्र लिहिण्याची संधी दिल्याचे सांगितले. आता माझी ईडीची कोठडी संपली आहे, पण न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी तुला हे पत्र लिहित आहे. तसेच, १ ऑगस्टला जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला, तेव्हा त्या परिस्थितीत तू कश्यारीतीने ह्या सगळ्याला सामोरे गेली याचे वर्णन करताना मी नक्कीच परत येईन, असा शब्द त्यांनी आपल्या आईला दिला आहे.

पत्रात पुढे त्यांनी म्हटले की, मला अन्यायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या शत्रूपुढे झुकता येत नाही. मी याविरोधात लढा देत आहे, म्हणून तुझ्यापासून दूर गेलोय. जेव्हा मोठे नेते शिवसेना सोडून गेले, तेव्हा तुला होणारा त्रास मी पहिला. आताही एवढे सगळे घडूनही तू शिवसेना वाचव असे, मला सांगत होतीस. पण त्यासाठी लढावे लागेल असे म्हणत प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा ? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मी तुझ्याकडून शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू घेतले आहे. मराठी बाणा व शिवसेना आणि बाळासाहेबांशी कधीच बेईमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेला आहे. म्हणून त्यासाठीच मी आज खंबीरपणे उभा आहे. आणि ही हिंमत तू आणि बाळासाहेबांनी मला दिली आहे. माझ्यावर ज्याप्रकारे खोटे आरोप लावले, त्याचप्रकारचा त्रास टिळक, सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला आहे. पण म्हणून ज्या पक्षावर संकटे आलीत, अशा कठीण काळात मी उद्धव ठाकरेंना सोडलो. तर उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू ? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

पत्राच्या शेवटी, जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे. त्यांच्याशी बेईमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता, मला धमक्या येत होत्या. पण मी असल्या दबाव आणि धमक्यांना भीक घातली नाही, त्यामुळेच मी आज तुझ्यापासून लांब आहे. तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील. त्यामुळे काळजी करू नको, मी परत येईन, असा विश्वास संजय राऊतांनी दिला आहे.

राऊतांना १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणाच्या आरोपाखाली संजय राऊत यांना मुंबई सेशन कोर्टाने पुन्हा सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे ते आता १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असतील.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here