दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या २० वर्षीय गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी

0
22

मुंबई : मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान गंभीर जखमी झालेल्या करीरोड येथील २० वर्षीय प्रथमेश सावंत या गोविंदाच्या मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आज शनिवारी मुंबईतील केईएम रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली असून त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारने कोरोना निर्बंध हटवल्यामुळे यंदा सर्वत्र मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरा करण्यात आली. त्यामुळे ठिकठिकाणी दहीहंडीचा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमेश हा १९ ऑगस्टला दहीहंडीच्या दिवशी करीरोड येथील साईभक्त गोविंदा पथक येथे दहीहंडी फोडण्यासाठी गेला होता. त्यावेळी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेला थर कोसळला आणि थरात उभा असलेला प्रथमेश गंभीर जखमी झाला.

त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळेच त्याच्या शरीराची हालचाल आणि संवेदना ही बंद झाली होती. तेव्हापासून तो मुंबईतील केईएम रुग्णालयात मृत्युशी झुंज देत होता. उपचारादरम्यान त्याला न्युमोनियाचा निदान झाला. पण आज सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली.

तो जेव्हा रुग्णालयात दाखल होता, तेव्हा साईभक्त गोविंदा पथकातील काही युवक त्याची सुश्रुषा करत होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्यावरील उपचारासाठी पाच लाख रुपये मदत म्हणून दिले होते. यासोबतच काही गोविंदा पथकांनीही त्याला आर्थिक मदत केली होती.

प्रथमेशच्या आई-वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. काही काळाने त्याच्या बहिणीचेही आजाराने निधन झाले होते. तेव्हापासून त्याच्या नातेवाईकांनी प्रथमेशचा सांभाळ केला होता. १२वीनंतर त्याने आयटीआयचे शिक्षण घेतानाच डिलिव्हरी बॉय म्हणून घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे कामही तो करत होता. दरम्यान, यावर्षी मुंबई व ठाण्यात सुमारे २५०च्या आसपास गोविंदा जखमी झाले होते, त्यातील १९७ गोविंदाना किरकोळ दुखापत झाली होती. तर दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here