मनपाच्या दोन हजार कर्मचाऱ्यांना मिळणार २३ कोटींचा फरक

0
22

द पॉईंट नाऊ: मनपातील ४ हजार ६७३ कायम तसेच ३२३१ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळण्याची प्रतीक्षा संपली आहे. पहिल्या टप्प्यात फरकाची बिले प्राप्त झालेल्या २५८ कर्मचाऱ्यांना लाभ दिल्यानंतर आज शुक्रवार (दि. २३) जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात फरकापोटी २३ कोटी रुपये जमा होणार आहेत. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात फरक मिळणार आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर १ जानेवारी २०१६ पासून मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा तसेच फरक मिळण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२१ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी व भत्ता लागू करण्यात आला. तसेच वेतन फरकाची प्रलंबित रक्कम पाच टप्प्यात अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी कर्मचारी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. पहिल्या टप्प्यातील रक्कम ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्याच्या वेतनात अदा केली जाणार होती. त्यामुळे ४६७३ नियमित कर्मचारी, ३२३१ सेवानिवृत्त कर्मचारी तसेच दहा हजारांहून अधिक शिक्षकांना गणेशोत्सवात फरक मिळण्याची आशा होती. मात्र वेतन फरकाची रक्कम देणारे सॉफ्टवेअरमधील तांत्रिक घोळ आड आला. त्यामुळे आज जवळपास दोन कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार आहे. मनपाचे ५०० हून अधिक कर्मचारी फिक्स पे अर्थातच कायम वेतनावर काम करत आहेत. २०१६ पूर्वी सेवेत कायम झालेल्यांच्या फरकाची बिले तयार असून, उर्वरित कर्मचाऱ्यांची बिले ऑक्टोबर महिन्यात तयार होतील. बिटको रुग्णालय तसेच आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापन विभागामधील कर्मचाऱ्यांची देयके देखील दुसऱ्या टप्प्यात दिली जाणार असल्याचे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांनी सांगितले.

सेवानिवृत्तांच्या पदरी प्रतीक्षाच
मनपातील कायम अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगानुसार उपदान, अंशराशीकरणापोटी देय फरकाची रक्कम अदा केली जाणार आहे. २०१६-१७ या काळात सेवानिवृत्त झालेल्यांना २०२२-२३, २०१७-१८ मध्ये सेवानिवृत्त झालेल्यांना २०२३-२४, २०१८ १९ मध्ये सेवानिवृत्त झालेल्यांना २०२४-२५, २०१९-२० मध्ये सेवानिवृत्त झालेल्यांना २०२५ २६, तर २०२०-२१ मध्ये सेवानिवृत्त झालेल्यांना २०२६ – २७ पर्यंत फरकाची रक्कम अदा केली जाणार आहे. मात्र प्रशासनाकडून लेखा विभागाकडे एकही बिल सादर न झाल्याने सेवानिवृत्तांना ऑक्टोबर महिन्यातच फरकाची रक्कम मिळणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here