द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गुंजाळ नगर येथील युवक पियुष आहेर (वय २१ ) याने शनिवारी दुपारी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही.
शुक्रवारी देखील लोहोणेर येथील ललित जोशी ह्या इंजिनिअरींगच्या विद्याथ्र्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तालुक्यात दोन दिवसात दोन युवकांच्या आत्महत्येच्या ह्या घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुंजाळ नगर येथील रहिवाशी असलेले मंगेश सुकदेव आहेर यांचा मोठा मुलगा पियुष मंगेश आहेर याने शनिवारी दुपारी साडेबारा वाजेचे सुमारास आपल्या घराच्या माडीवर गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याची आई घरकाम करीत होती.
पियुष विद्युत रोषणाईसाठी लाईटींग भाडयाने देण्याचा व्यवसाय करीत होता. त्याचे कडे कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी पियुषला फोन केला असता प्रत्युत्तर मिळत नसल्यामुळे त्यांनी घरात जाऊन त्याच्या आईकडे विचारणा केली.आईने त्यांना पियुष माडीवर असल्याचे सांगितल्यानंतर कर्मचारी माडीवर गेले असता त्यांना पियुषने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पियुषचे काका योगेश आहेर यांनी देवळा पोलिसांना घटनेची खबर दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात पियुष वर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम