नवी दिल्ली – अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका माजी खेळाडूची अध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांनी देशातील अव्वल खेळाडू बायचुंग भुतियांवर एकतर्फी विजय मिळवला. दरम्यान, महासंघाच्या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील मालोजीराजे छत्रपती यांची सदस्यपदी निवड झाली आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा)चे उपाध्यक्ष असलेले माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची महाराष्ट्रातून फुटबॉल महासंघाच्या सदस्यपदी निवड झालेले ते एकमेव सदस्य आहेत. ते गेली दहा वर्षे विफाचे उपाध्यक्ष तसेच कोल्हापूर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्षपदावर विराजमान आहेत. फुटबॉलच्या प्रसारासाठी त्यांचे योगदान लक्षणीय आहे.
दरम्यान, कल्याण चौबे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायचुंग भुतियांवर ३३-१ असा एकतर्फी विजय मिळवला आहे. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते एन. ए. हॅरिस आणि खजिनदारपदाच्या निवडणुकीत किपा अजय यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार कल्याण चौबे व बायचुंग भुतिया हे ईस्ट बंगाल क्लबकडून एकत्र खेळलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम