लष्करी जवानाने केला सत्यशोधक पद्धतीने विवाह

0
44

प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील रहिवासी योगेश्वर धाकराव या भारतीय सेना दलातील जवानाने भारतीय लष्कराच्या आदर्शांचे पालन करीत जाती-धर्म भेद दुर ठेवून व कालबाह्य रूढी-परंपरांना बाजूला सारून सत्यशोधक पद्धतीने विवाह करीत समाजासमोर एक मोठा आदर्श घालून दिला आहे.

निफाड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धारणगाव खडक येथील रहिवासी रामभाऊ धाकराव यांची ज्ञानेश्वर आणि योगेश्वर ही दोन्ही मुले भारतीय सेना दलात देशसेवेचे कर्तव्य बजावीत आहेत. भारतीय लष्करामध्ये जातीभेदाला व धर्म भेदाला स्थान नसल्याने आपला विवाहदेखील कोणत्याही धार्मिक रीतिरिवाज शिवाय आणि कालबाह्य रूढी परंपरांना वगळून करण्याचा निश्चय योगेश्वर यांनी केला.

कोल्हापूर येथील एडवोकेट श्रेया पवार यांची योगेश्वर यांच्याबरोबर मते व मने दोन्ही जुळल्याने त्यांनी देखील महात्मा फुले यांनी घालून दिलेल्या आदर्शा नुसार सत्यशोधकी पद्धतीने विवाह करण्यास होकार दिला. निफाड येथील भाग्यश्री लॉन्स मध्ये नुकताच हा विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्यामध्ये धार्मिक रीतिरिवाजांना संपूर्णपणे फाटा देण्यात आलेला होता.

अक्षदा ऐवजी वधू-वरांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. लग्नविधी साठी धर्मगुरू बोलवण्या ऐवजी महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा, सांगली व निफाड येथील कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. वधूवरांमध्ये धरण्यात आलेला अंतरपाट हा भारतीय राज्यघटनेचा सरनामा होता तर वधू-वरांनी देवादिकांना वंदन करण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. वधू-वरांच्या स्वागतासाठी देखील कर्णकर्कश डीजे बँड ऐवजी पारंपरिक संबळ पिपाणी या वाद्यांचा वापर करण्यात आलेला होता.

या सोहळ्यामध्ये वधूची ओटी भरण्याचा कार्यक्रम हा वधूच्या हातात गुलाब पुष्प , संविधानाची प्रत आणि वैचारिक पुस्तके देऊन करण्यात आला. विवाह सोहळ्यासाठी जमलेल्या पाहुणे मंडळींना देखील गुलाब पुष्प आणि भारतीय संविधानाच्या सरनाम्याची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here