सुशिल कुवर
पालघर : गर्भवतीला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी इथे ही हृदयद्रावक घटना घडली.
या गावात रस्ता नसल्याने वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला. परंतु आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिला तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू डोळ्यादेखत पाहावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली.
या गावातील ही दुसरी घटना आहे. रस्ता नसल्याने दोन-तीन महिलांना डोलीतून दवाखान्यात नेण्याची वेळ आली होती. मोखाडा तालुक्यात अशी अनेक गावं आहेत ज्यात सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
आजही आदिवासी प्राथमिक सुविधापासून वंचित
पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात रस्ते, विज, पाणी आणि आरोग्य या सारख्या प्राथमिक सुविधा आदिवासींना मिळालेल्या नाहीत. आजही येथील आदिवासींना रस्त्याअभावी डोलीकरुन पायपीट करत दवाखान्यात जावं लागत आहे. तर वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने प्राण गमवावे लागत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम