बीड: मराठा समाजाचा आवाज विनायक मेटे (Vinayak Mete) आज अनंतात विलिन झाले. या लढवय्या नेत्याच्या पार्थिवाला आज अग्नी देण्यात आला अन् एक योध्याचा प्रवास थांबला. विनायक मेटे यांचे बीडमधील शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मेटे यांचे रविवारी पहाटे अपघातात निधन झाले होते. त्यांना अखेरचा निरोप देताना सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आले तर अनेकांनी टाहो फोडला होता.
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी या योद्याने रान पेटवले होते, विनायक मेटें अपघाती मृत्यूनंतर राज्यात शोककळा पसरली आहे, बीड शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला, मेटे यांचे पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री आणण्यात आले. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम भवनासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होतं. अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात आणण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून अनेकांच्या अश्रूंचे बांध फुटले आहेत.
दरम्यान, विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास राज्यांतील दिग्गज नेते उपस्थित होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यावेळी उपस्थित होते. तसेच अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विनायक मेटे यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांची हजारोच्या संख्येने गर्दी केली होती.
अपघाताच्या चौकशीची करा
काल पहाटे अपघात झाल्यानंतर अनेकांनी संशय व्यक्त केला. विनायक मेटे यांचं पार्थिव काल मुंबईतून दुपारी 3 वाजता अॅम्ब्युलन्सनं बीडला नेण्यात आले. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले . मेटे यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात असून दरम्यान मेटे यांच्या अपघातानंतर या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी कार्यकर्त्यांसह मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी देखील केली आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले असून अहवाल काय येतो याकडे लक्ष लागून आहे.
काल पहाटे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही दुर्दैवी घटना घडली. मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, हा अपघात नेमका कसा झाला याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
कोण होते विनायक मेटे?
विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे राज्यातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आक्रमक आंदोलनं केले. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी असून. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य मेटे राहिले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम