नवी दिल्ली – देशात कोरोना संसर्गात नव्याने वाढ होत असताना केंद्र सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून ही विशेष मोहीम सुरू होणार आहे
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविणार आहे. यासाठी मोहिमेअंतर्गत ७५ दिवस सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे मोफत बूस्टर डोस दिले जाणार आहेत.
देशात १८ ते ५९ वयोगटातील ७७ कोटी लोकांना प्रतिबंधात्मक डोस द्यायचा आहे. त्यापैकी १ टक्क्यांहून कमी लोकांनी आतापर्यंत बूस्टर डोस घेतली आहे. तथापि, ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील 26 टक्के लोक व फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्यात आला आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दोन्ही डोस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील प्रतिपिंडाची पातळी सुमारे सहा महिन्यांनी कमी होत आहे. अशा परिस्थितीत बूस्टर किंवा सावधगिरीचा डोस दिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने ७५ दिवसांसाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत १८ ते ५९ वयोगटातील लोकांना सरकारी केंद्रांवर कोरोनाचा मोफत बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड लसींच्या दुसऱ्या डोसमधील अंतर ९ महिन्यांवरून ६ महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या शिफारशीच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम