दिल्ली – बऱ्याच दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेली श्रीलंकेतील परिस्थिती आता हाताबाहेर जात असल्याची चिन्हे दिसत आहे. शनिवारी आंदोलकांनी राष्ट्रपती भवन ताब्यात घेताच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे तिथून पळून गेले.
श्रीलंकेत गेल्या अनेक दिवसांपासून सरकारविरोधात निर्दशने सुरु आहेत. त्यातच आज शनिवारी हजारो आंदोलकांनी कोलंबोतील रस्त्यांवर उतरले व थेट राष्ट्रपती निवासस्थानात धडक दिली. यावेळी त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. मात्र आंदोलकांना निवासस्थानात प्रवेश करण्यात यश आले. दरम्यान असे सांगितले जाते की, राजपक्षेंना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. २ कोटी २० लाख एकूण लोकसंख्या असलेली श्रीलंका सध्या चीनकडून घेतलेले कर्ज आणि त्यामुळे झालेल्या परकीय चलनाच्या तीव्र टंचाईशी झुंज देत आहे. येथे इंधन, अन्न आणि औषधांची आयात मर्यादित होत आहे. श्रीलंका गेल्या सात दशकांतील भीषण अश्या आर्थिक संकटात सापडली आहे.
शनिवारी आंदोलकांनी हातात काळे ध्वज आणि राष्ट्रध्वज घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. ‘गोटा गो होम’ (गोटाबाये घरी जा) अशा घोषणा देत त्यांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला. तसेच राष्ट्रपती गोटाबाया यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे. आंदोलक मोठ्या संख्येने उतरून आंदोलन करणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत शुक्रवारी रात्री ९ पासून पुढील आदेशापर्यंत कर्फ्यू लागू केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम