देवळा महाविद्यालयात ओझोन दिवस साजरा

0
19

सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : येथील कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज ओझोन थराचे संरक्षण : काळाची गरज या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करुन जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बी.के.रौंदळ हे होते. यावेळी प्रमुख वक्ते आर.एन.शिरसाठ यांनी ओझोनचा थर,त्याची निर्मिती प्रक्रिया,ऱ्हासाची कारणे समजावून सांगितली. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणातील स्ट्रॅटोस्पिअर मधील ओझोनचा थर हा पृथ्वीभोवती साधारणपणे १५ ते ३५ कि.मी.उंचीवर असून त्याद्वारे सूर्याकडून येणारे हानीकारक अतिनील किरणे शोषून घेतली जातात.

त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीचा घातक अतिनील किरणांपासून बचाव होतो. औद्योगिकीकरण, वाहनांचा वाढता वापर, शीतगृहे, वातानुकूलित यंत्रे यामुळे वातावरणात हानिकारक वायू सोडले जाऊ लागले. मुख्यत्वेकरून क्लोरोफ्ल्युरोकार्बन (सीएफसी) यांच्या वाढत्या प्रमाणामुळे ओझोन थर काही ठिकाणी विरळ होऊ लागल्याचे ऐंशीच्या दशकात शास्त्रज्ञांना लक्षात आले. अंटार्टिका सारख्या भागात ओझोनचा थर खूप विरळ झाला, त्यालाच ओझोन होल असे म्हटले गेले.‌

ओझोनचा थर विरळ झाल्यामुळे घातक अतिनील किरणे जीवसृष्टीपर्यंत पोहोचल्याने मानवात व प्राण्यात त्वचारोग, त्वचेचे कॅन्सर,डोळ्यांची आग होणे,तापमान वाढ,चक्रीवादळे असे अनेक धोके दिसू लागल्याने १६ सप्टेंबर १९८७ या दिवशी कॅनडातील मॉन्ट्रीयल येथे ओझोनचा ऱ्हास थांबवणे व त्याचे संरक्षण करणे यासंबंधीचा जागतिक करार झाला. या कराराला मॉन्ट्रियल करार असे संबोधतात. त्याची अंमलबजावणी १९८९ पासून करण्यात आली.१९९४ पासून १६ सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस किंवा ओझोन संरक्षक दिवस म्हणून जगभर साजरा केला जाऊ लागला.

क्लोरोफ्ल्युरोकार्बन (सीएफसी) निर्मिती करणाऱ्या उपकरणांवर निर्बंध घालण्यात येऊन त्यांची निर्यात थांबवण्यात आली. पुढील काळात सीएफसी फ्री उपकरणे तयार करून ओझोनचा ऱ्हास थांबवण्यात यश आले.

ओझोनचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने हानीकारक वायूनिर्मिती करणारे उपकरणे वापरण्याचे टाळून, वाहनांचा कमीत कमी वापर, त्यांची वेळेवर तपासणी व निगा, जंगले वाचवून नवीन वृक्षलागवड करणे काळाची गरज आहे, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक डी.डी.आहेर, श्रीमती एन.वाय.पाटील, आर.पी.चौधरी, रा.से.योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी ए.एस.गुजरे यांनी केले तर यु.आर.वाघ यांनी आभार मानले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here