प्रतिनिधी, नाशिक:
जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, मंगळवारी तब्बल ४७ जणांना कोव्हिड-१९ चे निदान झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. पॉझिटिव्हिटी दरही तीन टक्क्यांच्या पुढे सरकला असून, करोना वाढीची धास्ती निर्माण झाली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज दोन-पाच रुग्णच बाधित आढळत होते. परंतु, हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेली. करोना निदान चाचण्या वाढविल्यामुळे बाधित आढळणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेच आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ३५च्या जवळपास रूग्ण बाधित आढळत. परंतु, मंगळवारी दिवसभरात ४७ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. त्यापैकी ३८ जण नाशिक शहरातील रहिवाशी आहेत. ग्रामीण भागातील सात, तर जिल्ह्याबाहेरील दोन जणांनाही कोव्हिड-१९ चे निदान झाले आहे. तुलनेत केवळ १५ रुग्णांनी करोनावर मात केल्याने सक्रिय रुग्णांची संख्या २१० पर्यंत पोहोचली आहे. एकट्या नाशिक शहरात सध्या १३७ रूग्ण उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांपैकी ४२ रुग्णांना लक्षणे असून १६८ जण लक्षणेविरहीत आहेत. तीन रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ग्रामीण भागात स्वॅब संकलन वाढविण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात ५९८ स्वॅब संकलित करण्यात आले असून, प्रलंबित अहवालांची संख्या ७३५ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे बुधवारी रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम