द पॉईंट नाऊ ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार राष्ट्रपती होणार अशी चर्चा सध्या होऊ लागली आहे. आणि याला कारण आहेत ते काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले. पटोले यांनी नुकतेच शरद पवारांना राष्ट्रपती करणार म्हणून वक्तव्य केले आहे.
मात्र राष्ट्रपती पदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा चालू आहे. त्यात सध्या केरळचे विद्यमान राज्यपाल मोहंमद आरिफ खान यांचे नाव अधिक चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर त्यांचा सखोल अभ्यास असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होत आहे.
राष्ट्रपती पद निवडणुकीचे मतदार कोण?
या निवडणुकीसाठी लोकसभा, राज्यसभा, राज्याच्या विधानसभा, केंद्रशासित दिल्ली आणि पुदुच्चेरी यांचे विधानसभा सदस्य हे मतदान करू शकतात. अर्थात, विधानसभांचे 4120 आमदार, लोकसभेचे 543 खासदार आणि राज्यसभेचे 233 खासदार मतदान करू शकतात. अर्थात या निवडणुकीसाठी सध्या 10.98 लाख मतांचे एकूण मूल्य आहे.
कोणाकडे किती मताधिक्य आहे?
दरम्यान, राष्ट्रपती पद निवडणूकीसाठी पाहायला गेले, तर भाजपकडे अधिक मताधिक्य आहे. त्यात त्यांना नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीचा देखील निश्चितच फायदा होणार आहे. आणि भाजपकडून सध्या राष्ट्रपती पदासाठी चाचपणी सुरू आहे. यासाठी आपल्या घटक पक्षांसोबत आणि इतर पक्षांसोबत देखील चर्चेची जबाबदारी भाजप नेते राजनाथ सिंग आणि नड्डा यांच्यावर देण्यात आली आहे. त्यात भाजपकडे सध्या त्यांच्या घटक पक्षांना सोबत घेऊन 50 टक्क्यांहून अधिक मताधिक्य होते. यामुळे या निवडणुकीत भाजपचे पारडे अधिक जड मानले जात आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ममता बॅनर्जी यांनी 22 विरोधी पक्षांना येत्या 15 जून रोजी आमंत्रित केले आहे. या बैठकीत राष्ट्रपती निवडणूक संदर्भात चर्चा होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यात शिवसेना देखील मराठी माणूस म्हणून पाठिंबा देणार हे जवळपास निश्चित आहे. पण UPA कडे राष्ट्रपती पद निवडणुकीसाठी त्यांचा उमेदवार निवडून येईल, हे मताधिक्य नाहीच. NDA मध्ये भाजपसह जनता दल, राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष, AIADMK, NPP, NDPP आदींसह इतर मित्रपक्षांचे मिळून मताधिक्य होते 334 आणि विरोधी पक्ष काँग्रेसकडे इतर विरोधी पक्ष मिळून मताधिक्य आहे 206. मात्र तरी देखील शरद पवारांना राष्ट्रपती करण्याच्या चर्चा होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
निवडणूक कधी?
आता हे समीकरण असतांना, राष्ट्रपती निवडीसाठी निवडणूक होणार की राष्ट्रपतींची बिनविरोध निवड होणार हे येत्या जुलै महिन्यातच स्पष्ट होईल. 18 जुलै रोजी निवडणूक तर 21 जुलै रोजी निकाल लागेल. तोपर्यंत नागरिकांना वाट पाहावी लागेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम