मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आज मंत्रालयात ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलताना त्यांनी जनतेला उद्देशून म्हणताना देशाला आणि राज्याला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रगतीपथावर नेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार जनतेसाठी झटत असून दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असल्याची ग्वाही यावेळी दिली.
पहिल्या दिवसापासून सामान्यांसाठी हे सरकार झटत आहे. पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणी वेगाने पंचनामे सुरू असून मदतीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी म्हटले की, मुसळधार पावसामुळे जवळपास २८ जिल्ह्यांना फटका बसला आहे. तसेच १५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुमारे १५ हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले, या नागरिकांची सर्व काळजी घेतली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. यातून नद्यांचे खोलीकरण, गाळ काढणे आदी कामांसाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच धनगर, ओबीसींना आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहेत. दुर्बल घटकांच्या विकासासाठी अमृत संस्थेला उभारी देण्यात येणार असल्याचे ते बोलले. स्टार्टअपसाठी सरकारकडून पाठबळ देण्यात येत आहेत, राज्यात नवीन उद्योजक तयार कसे होतील याकडे लक्ष देत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्र सरकारसोबत संवाद सुरू असून अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. त्यासोबतच पोलिसांच्या घरासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच कांदळवनांचे संरक्षण व संवर्धनासाठी सरकार प्रयत्नशील आहे, हे लक्षात घेता येत्या वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगत ह्याद्वारे स्थानिकांना रोजगार देखील मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘आमचे गुरुजी’ उपक्रम सुरु करण्याची घोषणा
राज्य सरकार नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याअंतर्गत सरकारने ‘आमचे गुरुजी’ उपक्रम सुरू केले आहे. यामध्ये वर्गामध्ये शिक्षकाचे छायाचित्र आणि माहिती असणार आहे, ज्यातून विद्यार्थी आणि पालकांना शिक्षकांची ओळख होईल. राज्यात कुठलीही शाळा एकशिक्षकी राहणार नसल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम