द पॉईंट नाऊ ब्युरो : आत्तापर्यंत उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द, पुन्हा नंतर सुट्ट्या रद्द नाहीत. अशा बातमीने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सर्वच संभ्रमात होते. मात्र आता ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे, अशा शाळांना 2 मे पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
आधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द करण्यात येऊन, शनिवार आणि रविवारी देखील शाळा सुरू ठेवण्याचा आदेश काढण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र नंतर यावर शिक्षण आयुक्तांनी स्पष्टीकरण देतांना, सुट्ट्या रद्द नसून ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे, अशा शाळांना सुट्ट्या राहतील आणि ज्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे, अशा शाळा सुरू राहतील हे स्पष्ट करण्यात आले होते.
आता यावर अजून स्पष्टीकरण देतांना शिक्षण विभागाने शाळांना 1 ली ते 9 वी आणि 11 वी च्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेऊन, 1 मे रोजी निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना 2 मे पासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतील. मात्र अभ्यासक्रम अद्याप अपूर्ण असलेल्या शाळा मात्र सुरू राहणार आहेत.
दरम्यान, अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा व निकाल झालेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देखील उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम