द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (देवळा) : तालुक्यातील वासोळ येथील तरुण शेतकरी हेमंत देसले यांनी थंड वातावरणात येणारे कॅरोटीन व वेलेटिना या रंगीत कोबी वाणाची लागवड करून भरघोस उत्पादन घेतलय. महाराष्ट्रात प्रथमच हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्यांचा प्लॉट पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी गर्दी करत आहेत.
हेमंत देसले यांनी गुगलवर शोधाशोध करून या रंगीबेरंगी फुलकोबीबद्दलची माहिती मिळवली. त्यानंतर सिजेटा कंपनीकडून बियाणे खरेदी करून २० गुंठ्यात या फुलकोबीचे उत्पादन घेतले. प्रथमच नारंगी, हिरवा व पिवळा या तीन रंगांतील फुलकोबीचा हा प्रयोग राज्यात नाशिक जिल्ह्यात यशस्वी झाला आहे.
या पिकाच्या उत्पादनासाठी थंड हवामानाची गरज असते. नोव्हेंबर महिन्यात फुलकोबीचे उत्पादन घेतले जाते. यंदा राज्यात थंडीचा कडाका असून या थंडीचा फायदा या फुलकोबीला झाल्याचे देसले सांगतात. रंगीत फुलकोबीचा हा पहिलाच प्रयोग असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
रंगीत फुलकोबीमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण अधिक असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या कोबीत अँटीऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम क्लोराईड आणि पाचक प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी जीवनसत्वे आहेत. त्यामुळे हा फुलकोबी आरोग्यदायी आहे. रंगीत कोबीची लागवड फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये केली जाते. भारतात बिहारमध्ये रंगीत कोबीचे उत्पादन घेतले जाते.
ऑक्टोबर नोव्हेंबर हे महिने लागवडीसाठी योग्य असून जानेवारी फेब्रुवारीत उत्पादन सुरू होते. वीस गुंठे क्षेत्रात साडेनऊ हजार रोपांची लागवड करून दोन तोड्यात साडेचार टन उत्पादन देसले यांनी घेतले. सरासरी पंचवीस ते तीस रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे. यासाठी वेगळी कुठलीही फवारणी करण्याची गरज लागली नाही.
देवळा तालुक्यातील वाजगाव येथील बाळासाहेब देवरे यांनी यापूर्वी थंडीत येणारे सफरचंद पिकाची यशस्वी लागवड केली होती. त्यानंतर देसले यांनीही रंगीत कोबीचे भरघोस उत्पादन घेतले आहे. त्यामुळे तालुक्यातील वातावरण हे थंड वातावरणात येणाऱ्या पिकांसाठी पोषक असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम