– सोमनाथ जगताप
देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत निवडणुकीत ओबीसीसाठी राखीव असलेल्या चार वार्डातील निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली तर दुसरीकडे शिवसेनेचे शहराध्यक्ष मनोज आहेर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अचानक भाजपात प्रवेश केल्यामुळे येथील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आता उर्वरित १३ प्रभागांसाठी ७४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सी. एच.देशमुख व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात आज मंगळवार (दि .७) रोजी देवळा नगरपंचायत निवडणुकीत धक्के बसत गेल्याने ही निवडणूक नव्या वळणावर येवून पोहोचली आहे. निवडणूक होईपर्यंत अजून काय काय घडामोडी होतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.
२१ डिसेंबरला होऊ घातलेल्या नगरपंचायतींमधील ओबीसी प्रभागातील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने देवळा नगरपंचायतीच्या ४, ८, १० व १३ या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली. यामुळे या प्रभागाती इच्छुक उमेदवारांना आता पुढील निर्णयाची प्रतीक्षा करणे भाग आहे. यादरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी येथे नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी येथील शिवसेनेचे शहराध्यक्ष मनोज आहेर यांना भाजपात वळवून घेत प्रभाग १७ ची उमेदवारी भाजप कडून देत महाविकास आघाडीला धक्का दिला.
या नगरपंचायत निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, शिवसंग्राम या पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. चार प्रभागांमधील निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने उर्वरित १३ प्रभागांसाठी ७४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल झाले. उमेदवारी अर्ज छाननी उद्या बुधवार (दि .८) रोजी असून त्यानंतर माघारीच्या दिवशी काय घडामोडी होतात याकडे पहाणे औत्सुक्याचे ठरले आहे.
देवळा नगरपंचायत निवडणुकीत एकूण चार वॉर्ड ओबीसी साठी राखीव असल्याने ४, ८, १०, १३ या वॉर्डातील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षण देण्यासाठी सर्व प्रयत्न केले सर्व पक्षीय बैठका घेतल्या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ५० टक्के मर्यादेच्या आत ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला असून राज्यपालांनी त्याला मान्यता ही दिली. त्यानंतरच ओबीसी आरक्षणासह निवडणुका लागल्या मात्र ओबीसी राखीव जागांचा पेच निर्माण होऊन त्या रद्द केल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के राजकीय आरक्षण दिले होते, त्या अध्यादेशाला सुप्रिम कोर्टाने काल स्थगिती दिल्याने देवळा नगरपंचायतीच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झालेल्या ४ प्रभागातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. उर्वरित एकूण १३ प्रभागातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे. यामुळे निवडणुकीची रणधुमाळी ओबीसी प्रभाग वगळता इतर प्रभागात पहावयास मिळणार आहे.
देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी दि ६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या असून भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी थेट शिवसेनेचे शहराध्यक्ष व वॉर्ड क्रमांक १७ चे उमेदवार मनोज आहेर यांना थेट भाजपाची उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम