द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्यप्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. यातून मनुष्य जर सत्प्रवृत्त असेल, निदान त्याच्यातील कृतज्ञतेची भावना मारली गेली नसेल, तर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना वाढीस लागते.

हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून देवळा येथील माजी सरपंच दिनकर आहेर यांचे पुत्र योगेश (नानू ) व मनोज आहेर यांनी स्वखर्चाने देवळा महाविद्यालय ते गुंजाळवाडी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे .
या उपक्रमाचे आहेर बंधुंचे देवळा व परिसरात कौतुक केले जात आहे. सध्या काही ठिकाणी होत असलेली अतिवृष्टी व पावसाने शेती पिकांसह रस्त्यांची वाट लागली आहे. यात नाशिक जिल्हाही सुटला नाही . या पावसाने देवळा तालुका विशेषतः देवळा ते सोग्रस फाटा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने खड्डे टाळण्याच्या नादात रोजच छोटे मोठे अपघात घडत आहेत .
देवळा महाविद्यालय ते गुंजाळवाडी पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत . याची दखल घेऊन योगेश ( नानू ) व मनोज आहेर या बंधूनी शनिवारी (दि ९) रोजी नवे जेसीबी मशीन खरेदी केले असुन ,आहेर बंधूनी रविवारी( दि १०) रोजी कामाचा शुभारंभ याठिकाणी खड्ड्यांवर मुरूम टाकून सामाजिक बांधिलकी म्हणून केला .
आहेर बंधूच्या ह्या स्वखर्चाने राबविलेल्या उपक्रमाचे देवळा शहरात व तालुक्यात कौतुक केले जात आहे . मात्र , तालुक्यात सर्वत्र ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून, खड्डे कधी दुरुस्त होतात व नागरिकांना कधी दिलासा मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे बनले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम