द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक सातपूर एमआयडीसीतील कंपनीत अचानक स्फोट झाला असून या आगीत सहा कामगार भाजल्याची घटना घडली आहे. अधिक माहिती अशी की नायट्रोजन टाकीचा व्हॉल्व्ह उडाल्याने हा स्फोट झाल्याचे समजते. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
आवाजाने अक्षरशः कानठळ्या बसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी सांगितले. सातपूर येथील नाईस (NICE) परिसरात ललित हायड्रोलिक्स नावाची कंपनी आहे. कुणाल शिखरे हे या कंपनीचे संचालक आहेत. आज या कंपनीत अचानक सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास नायट्रोजन टाकीचा व्हॉल्व्ह उडाल्याने स्फोट झाल्याची माहिती आहे.
या कंपनीत एकूण ११ कामगार या कंपनीत काम करत होते. स्फोट इतका भीषण होता की कंपनीतून आगीचे लोळ बाहेर येत होते. दरम्यान , महापालिकेच्या आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या भागात प्रवेश बंद करण्यात आला आहे.
घटनेतील जखमी कामगारांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. चंद्रकांत पुंजराम मुंशे, सुरज टेकाळे, लखन, कृष्णा मुरारी, रोशन दास व देविदास पवार अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमी ७० ते ८० टक्के भाजल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जखमी हे ४० ते ४५ वर्ष वयोगटातील असल्याचे समजते.
दरम्यान, चंद्रकांत मुंशे, लखन आणि रोशन दास यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णाच्या नातलगांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम