भूषण सावळा-पाटील : मराठा आरक्षण विरोधातील याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नांदेड येथे नुकताच संभाजी राजे यांच्याद्वारे मोर्चा काढण्यात आला. याबाबत बोलतांना गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजी राजेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल करत गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजी राजेंना अटक करण्याची मागणी केली आहे.
सध्या कोरोनाचा प्रभाव पाहता सगळीकडे जमाव जमवण्यास, मोर्चे, आंदोलन करण्यास बंदी असतांना, खासदार संभाजी राजे यांनी मोर्चा काढलाच कसा? असा सवाल करत गुणरत्न सदावर्ते यांनी ही मागणी केली आहे.
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सगळ्यांना समान आहे. खासदार संभाजी राजे यांनी मोर्चा काढून कायदा मोडला आहे. त्यांना अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
मराठा आरक्षण हा मुद्दा अजूनपर्यंत मार्गी लागलेला नाही. कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने, संबंध मराठा समाजात असंतोष आहे. याच कारणास्तव मागील बऱ्याच काळापासून खासदार संभाजी राजे हे मराठा आरक्षण मुद्द्यावर मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत. त्याअंतर्गत त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेण्याचा धडाका लावला होता. त्यात त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना मराठा आरक्षणासाठी पुढे येण्याचे आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.
खासदार संभाजी राजे यांनी यादरम्यान शासनाला योग्य निर्णय घेण्यासंदर्भात अंतिम इशारा दिला होता. केंद्र शासनाद्वारे नुकताच कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना बहाल करण्यात आलाय. यावर नुकतीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील अंतिम मंजुरी दिली आहे. आता यावर महाराष्ट्र शासनाद्वारे मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
खासदार संभाजी राजे यांनी राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात विविध बैठका घेतल्या. या बैठकांदरम्यान बऱ्याच प्रकारचे निर्णय घेण्यात आले. याअंतर्गत खासदार संभाजी राजे यांनी मराठा समाजबांधवांना कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कोणीही मोर्चे न काढण्याचे, गर्दी टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र गुणरत्न सदावर्ते यांच्या या मागणीमुळे, संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम