द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : शिवशाहीर, शिवचरित्र्यकार बाबासाहेब पुरंदरे यांना देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ”शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेली इतर कामही कायमच स्मरणात राहतील,” असे म्हणत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी पुण्यात एका खासगी रूग्णालयात वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपुर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी याच वर्षी वयाची ९९ वर्षे पुर्ण करत १०० व्या वर्षात पदार्पण केलं. २९ जुलै रोजी पुण्यात त्यांच्या निवासस्थानी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना वाढदिवसानिमित्त माध्यमातून मराठीमधून शुभेच्छा दिल्या होत्या. ” बाबासाहेब पुरंदरेंची शिवाजी महाराजांबद्दल इतकी भक्ती उगाच नाही. शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेतच. पण भारताचा वर्तमान आणि भूगोलही त्यांच्या अमर गाथांनी प्रभावित आहे”, असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं.
बासाहेब पुरंदरे यांना २०१५ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलं तर २०१९ मध्ये केंद्रसरकारने पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारनेही बाबासाहेब पुरंदरेंना कालिदास पुरस्काराने सन्मानित केलं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम