शासकीय यंत्रणांनी गतीने व वेळेत पूर्ण कामे करावीत : पालकमंत्री छगन भुजबळ

0
14

मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव 108 फुट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सव 15 जून ते 30 जून 2022 या कालावधीत होणार आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी समन्वयाने व जलदगतीने आवश्यक ती सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आज मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी कार्यालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.

यावेळी आमदार दिलीप बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, प्रांताधिकारी बबन काकडे , बागलाण तहसिलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पांडूरंग कोल्हे, महावितरणचे अभियंता अनिल बोंडे, माजी आमदार दिपिका चव्हाण, संजय चव्हाण, भिलवडचे सरपंच गुलाबबाई गावित, 108 फुट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी पीठाधीश रवींद्रकिर्ती स्वामीजी, महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठता सी.आर.पाटील, कोषाध्यक्ष प्रमोद कासलीवाल, कार्याध्यक्ष अनिल जैन, भूषण कासलीवाल, जीवनप्रकाश जैन, सुमेरकुमार काले,ॲड.रवींद्र पगार, महेंद्र काले आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी स्थानिक व बाहेरील शहरांतून भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत. यासाठी महामार्गावरील दिशादर्शक फलकांची दुरूस्ती करणे व आवश्यक ठिकाणी नवीन दिशादर्शक फलक त्वरीत लावण्यात यावेत. त्याचप्रमाणे महोत्सव काळात डोंगरावर मूर्तीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी असेलेल्या उदवाहक यंत्रणा सतत्याने सुरू राहण्यासाठी, त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी येणाऱ्या भाविकांसाठी स्ट्रीट लाईटसची व्यवस्था करणे याकरीता वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी महावितरणचे अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी योग्य समन्वय साधून या गोष्टी प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी दिल्या आहेत.

ते पुढे म्हणाले की, या महोत्सव काळात डोंगरावरील मूर्तीच्या ठिकाणी हरणबारी धरणातून पाणी उचलण्यासाठी पाण्याच्या पाईपलाईनची वेळेत दुरूस्ती व जोडणी कायमस्वरूपी करण्यात यावी. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास यात्रा कालावधी संपल्यानंतर सुद्धा स्थानिक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यादृष्टीने कार्योत्तर मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबधित यंत्रणेला दिल्या आहेत. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणांनी सतर्क राहून यात्रेच्या ठिकाणी चोख बंदोबस्ताची व्यवस्था करावी. यासाठी वेळ पडल्यास वाढीव मनुष्यबळ व होमगार्डस यांचीसुद्धा सेवा घेण्यात यावी, असेही यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले.

यात्रा काळात आरोग्य यंत्रणांनी रूग्णवाहिका, डॉक्टर्स, परिचारीका, औषधे यांची सुसज्ज व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका यांनी समन्वयाने या ठिकाणी यात्रा काळात स्वच्छतेच्या दृष्टीने जंतुनाशक औषधे फवारणी, फिरते शौचालय आदी व्यवस्था करावयाची आहे. पुढील बैठकीपूर्वी सर्व यंत्रणांनी वेळेतच कामे पूर्ण करावीत अन्यथा जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे निर्देशही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

यावेळी सुरूवातीला पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी या परिसराची पाहणी केली. त्यानंतर मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव 108 फुट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सव पत्रिकेचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here