शाळांना दणका ; विद्यार्थ्यांना दिलासा

0
92

शैक्षणिक प्रतिनिधी:कोरोना काळातील शुल्कवाढ रद्द करण्यासह राज्यस्थान प्रमाणे 15 टक्के शालेय शुल्क कमी करावे.तसेच कोरोना काळात केलेली फी वाढ रद्द करण्याचे निर्देश शाळांना द्यावेत,असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील पालकांना मोठा दिलासा मिळाल्याचे याचिकाकर्ते पालक जयश्री देशपांडे आणि प्रसाद तुळसकर यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाने 1 मार्च 2021 रोजी राज्यातील शाळांना शालेय फी वाढ करण्यास परवानगी दिली होती. पालकांनी वाढीव फी भरली नाही, तरी मुलांना शाळेतून काढू नये, इतकाच दिलासा न्यायालयाने दिला होता. मात्र, शाळांना फी वाढ करण्यास बंदी घालावी, ही पालकांची मागणी कोर्टाने मान्य केली नव्हती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. महाराष्ट्र शासनाकडे पालकांनी 22 जुलै 2021 रोजी केलेल्या फी कमी करण्याच्या अर्जावर 3 आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

राजस्थानच्या धर्तीवर मागील वर्षीच्या शुल्कात 15 टक्के कपात करावी,शाळांनी वसूल केलेले अतिरिक्त शुल्क यावर्षीच्या फीमध्ये समायोजित करावे,असा आदेश शाळांना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.तसेच ज्या शाळांनी फी वाढ केलीय, तीदेखील रद्द होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार लवकर निर्णय घेण्यासाठी पालक राज्य सरकारकडे अर्ज करणार आहेत.राज्य शासनाला 21 दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक आहे.

काय आहे राजस्थानचा निर्णय…

राजस्थानसाठी सर्वोच्च न्यायालयाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी जे शुल्क होते. त्यात १५ टक्के टक्के कपात करून २०२०-२१ यावर्षी शुल्क घेण्यात यावे असा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानचा निर्णय ग्राह्य धऱण्याचे आदेश दिल्याने या आदेशामुळे महाराष्ट्राला गतवर्षीच्या शुल्काच्या १५ टक्के शुल्क कमी करणे शाळांना बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाला मिळाला आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाला २१ दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्य वकील ॲड. मयंक क्षीरसागर यांच्यासह ॲड.सिद्धार्थ शंकर शर्मा व ॲड. पंखुडी गुप्ता यांनी राज्यातील याचिकाकर्त्या पालकांच्या वतीने काम पाहिले. या याचिकेत १५ पालक याचिकाकर्ते होते. नाशिक मधून नीलेश साळुंखे, प्रदीप यादव, हरीष वाघ, राजेश बडनखे, रुपेश जैसवाल आणि कामरान शेख या पालकांनी याचिकाकर्ते म्हणून सहभाग घेतला. 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here