द पॉईंट नाऊ विशेष ; देवळा नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य लक्षवेधी लढत ही वॉर्ड क्र. 5 मध्ये होण्याचे चित्र जवळपास निश्चित झाले आहे. या वॉर्डात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा संघर्ष होईल असे वाटत असतांनाच या वॉर्डात दोघ बाजुंनी बंडखोरी होऊन अपक्ष मैदानात उतरण्याची तयारी देखील उमेदवारांची झाली आहे.
वॉर्ड क्रमांक 5 मध्ये नुकतेच भाजपवाशी झालेले जितेंद्र आहेर हे भाजपतर्फे प्रबळ दावेदार आहेत तर त्याच बरोबर युवा नेते किरण आहेर देखील भाजपतर्फे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यामुळे भाजपाचे तिकीट कोणाच्या पदरात पडणार हे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे तिकिटासाठी दोघेही इच्छुक हे भाजप साठी नवीनच आहेत, कारण यापैकी कोणीही ना संघाच्या शाखेतून आलेत न चळवळीतुन दोघेही आलेत काँग्रेस मधून यामुळे भाजप साठी दोघेही दावेदार हे आयात केलेले असणार आहेत. पक्ष नेतृत्वाला तिकीट देतांना बंडखोरीला मात्र सामोरे जावे लागणार आहे.
महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी कडून सुनील गंगाधर आहेर हे इच्छुक आहेत तर शिवसेनेतर्फे नानाजी दौलत आढाव हे इच्छुक आहेत, या जागेमुळे महाविकास आघाडीत वादंग निर्माण होते की सेनेचे स्थानिक नेतृत्व नमते घेऊन ही जागा राष्ट्रवादीला सोडते हे बघणं महत्त्वाचे आहे. ही जागा राष्ट्रवादीला गेल्यास आढाव हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे बंडखोरीच्या ग्रहनात आघाडी अन भाजपा अडकले हे नक्की.
या वॉर्ड मध्ये नगरपालिका असतांना जितेंद्र आहेर यांनी 10 वर्ष नेतृत्व केले आहे, त्यांच्या कार्यकाळात रस्ता तसेच पाण्याची सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत,तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत तर दुसऱ्या बाजूला किरण आहेर यांची युवावर्गात असलेली लोकप्रियता वाखाण्याजोगी आहे, प्रत्येकाच्या मदतीला ते नेहमी धावून जात असतात, सध्या याच प्रभागाचे नेतृत्व त्यांच्या घरात आहे, त्यातून झालेले विकास कामे देखील त्यांच्या सोयीचे होणार आहेत, सुनील आहेर यांनी गेल्या पाच वर्षांपासून जनसंपर्क वाढवला आहे. त्यांची भाऊबंदकी देखील मोठी आहे, तसेच नातेवाईक या वॉर्डात आहेत, त्यांच्या मितभाषी स्वभावाचा त्यांना फायदा होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला नानाजी आढाव हे देखील मैदानात उतरले आहेत, त्यांचा मुलगा मुन्ना आढाव यांच्या सोबत असलेल्या युवा वर्गाचा गोतावळा मोठा आहे, तसेच समाजाचे मतदान संख्या जास्त आहे, सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व तसेच निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरत असल्याने लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असणार आहे ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
या वॉर्डमध्ये चौरंगी लढतीचे चित्र आता दिसत असले तरी येत्या काळात किमान तिरंगी लढत शक्य आहे. जितेंद्र आहेर विरुद्ध किरण आहेर यांच्यात बंडखोरी होऊन थेट होणाऱ्या सामन्यात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असो हे सर्व अंदाज आहेत मात्र संभाव्य उमेदवार हे सर्व प्रबळ असल्याने सामना दर्जेदार होणार अन निकाल धक्कादायक लागणार यात शंका नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम