द पॉईंट नाऊ ब्युरो : लोहणेर देवळा तालुक्यातील लोहणेर येथे सुरू असलेला मटका राजरोसपणे सुरू आहे. याबाबत पोलिसांना माहिती देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने अवैध धंदेचालक आणि पोलिसांची ‘मिलीभगत’ आहे का? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी ‘द पॉईंट नाऊ’ने स्टिंग करून मटक्याचा भांडाफोड केला होता. सदर अवैध प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड आणि देवळा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले होते. परंतु, कोणतीच कारवाई झाली नसल्याने पोलिसांच्या आशीर्वादानेच हे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे. त्यासाठी अवैध धंदेचालक आणि पोलिसांची आर्थिक तडजोड असल्याचा संशय बळावत आहे. पोलिसांनी मात्र निवडणुकीच्या धामधुमीत कारवाईस विलंब झाल्याचा दावा केला आहे.
पोलिसांचा अवैध धंदे व गुन्हेगारीवर वचक राहिला नसल्याने देवळा तालुक्यात अवैध धंदे पूर्वीसारखेच सुरू झाले आहे. ग्रामीण भागात गावठी दारू, जुगार, वाळूसह अवैध प्रवासी वाहतूक बिनबोभाट सुरू आहे. लोहणेर येथील पुलाखाली सटाणा – देवळा मार्गावर मटका सुरू असल्याचे पुरावे ‘द पॉईंट नाऊ’च्या हाती लागले आहेत. हे सर्व पोलिसांच्या निदर्शनास आणून देखील त्यांनी कोणतीही उचित कारवाई केली नसल्याने नागरिकांनी पोलिसांच्या उदासीन कारभाराबाबत ‘द पॉईंट नाऊ’कडे संताप व्यक्त केला आहे.
यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळण्याबरोबर तरुणाई मोठ्या संख्येने जुगाराच्या अधीन जात आहे. यासाठी पोलिसांनी वेळीच कडक पावले उचलून तालुक्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे. अन्यथा पोलिसांची अवैध धंदेचालकांशी मिलीभगत असल्याच्या संशयाला वाव मिळेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम