द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : अखेर लाल परी आता एकदाची रस्त्यावर धावणार आहे. एस. टी. संप लढ्याचे नेते अजय कुमार गुजर यांनी याबाबत घोषणा केली आहे.
जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेला संप सामान्यांसाठी मोठा त्रासदायक ठरला आहे. मात्र आता हा त्रास संपणार आहे.
अजय गुजर यांच्या नेतृत्वाखालील एस. टी. कामगार संघटनेने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता लवकरच सर्वांची लाडकी लाल परी रस्त्यावर पुन्हा धावणार आहे.
अजय गुजर यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा करतांना, सर्व संप करणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांना 22 डिसेंबर पर्यंत कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे.
मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला संप अनेक मागण्यांसाठी सुरू होता. पगार वाढ, वेळेवर पगार व्हावा, एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे अशा प्रमुख मागण्या एस. टी. कर्मचारी वर्गाद्वारे केल्या गेल्या होत्या.
राज्य शासनाद्वारे पगारवाढ देण्यातही आली. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असणारे एस. टी. कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नव्हते. निलंबन, सेवा समाप्ती, मेस्मा लावण्याबाबत इशारा असे अनेक शस्त्र राज्य शासनाने वापरून पाहिली. पण एस. टी. महामंडळाचे कर्मचारी आपल्या संपाची ढाल पुढे करून मागे हटत नव्हते.
आजच उच्च न्यायालयात एस. टी. कर्मचारी संप बाबत राज्य शासनाने आपली बाजू मांडली होती. त्यात याबाबत सुनावणी न्यायालयाने 22 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली होती. मात्र आता अचानकच एस. टी. संपाचे नेते अजय गुजर यांनी संप मागे घेण्याची घोषणा केल्याने आता प्रश्न सुटला असे चिन्ह दिसत आहे.
अजय गुजर यांच्या या घोषणे नंतर आता संपकरी एस. टी. कर्मचारी कामावर कधी हजर होणार? लाल परी कधीपासून रस्त्यावर धावणार? याची सामान्य नागरिक वाट पाहू लागले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम