द पॉईंट नाऊ ब्युरो : राणे म्हटलं की आपल्यासमोर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे नाव येत, मात्र आजन्म कॅबिनेट मंत्री हे महाराष्ट्राचे राणे नसून हे आहेत गोव्यातील काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांना आजन्म कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्यातील भाजप (BJP) सरकारने घेतला आहे.
राणेंनी त्यांचे पुत्र भाजप नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले की, आमच्या सरकारने ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांना आजन्म मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष अशी महत्वाची पदे भूषवली आहेत. गोव्यातील सर्व स्तरातील जनतेला ते कायम प्रेरणादायी ठरले आहेत. राज्य आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करीत असताना कायम त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला आवश्यकता आहे. भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. यामुळे देशात दिलदार राजकारण जिवंत असल्याचे दिसून आले.
नुकतेच काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना प्रतापसिंह राणे यांनी नुकताच निवृत्तीचा बॉम्ब टाकला होता. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. राणे म्हणाले की, राजकारणात सुमारे 50 वर्षे पूर्ण केली आहेत. आता मला विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. मला आता वाटत आहे की मी आराम करून नव्या पिढीला संधी द्यावी. गोवा प्रगतीशील राज्य असून, तरुणांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
राणे यांनी मुलाच्या विरोधात लढण्याची घोषणा 21 डिसेंबरला केली होती. यानंतर काँग्रेसने तातडीने पावले उचलत राणे यांना पोरीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. प्रतापसिंह राणे हे 82 वर्षांचे असून, ते 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी पुत्राच्या विरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा करुन राज्यात राजकीय भूकंप घडवला होता. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातले राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता राणे-पिता पुत्रांच्या लढतीने त्यात भर पडली होती. यामुळे रंगतदार सामना होणार म्हणून सर्व्यांचे लक्ष लागून होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम