तुषार रौदळ
सटाणा प्रतिनिधी : बागलाण तालुक्यात अपूर्ण अवस्थेत असलेल्या सिंचन योजना प्रकल्पांचे तातडीने अहवाल तयार करावेत जेणेकरून ते प्रकल्प मार्गी लावून शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाला भरीव काम करता येईल त्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा अहवाल सादर करावा असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत.
बागलाण तालुक्यात अनेक वर्षांपासून सिंचणाचे प्रकल्प रखडलेले आहेत. निवडणुकीच्या काळातच सिंचन प्रकल्प पुर्ण करू अशा अश्वासनांचा पुर पुढा-यांकडून सोडला मात्र निवडणुका संपल्यानंतर सिंचन प्रकल्पांकडे पाठ फिरवली जाते. अनेक वर्षांपासून या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांमुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. याची गाऱ्हाणी कृषीमंत्री दादाभुसे यांच्याकडे पोहचल्यानंतर मंत्री भुसे यांनी बागलाण पंचायत समितीच्या सभागृहात पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली.
हरणबारी धरणाच्या डाव्या कालव्याची वहण क्षमता वाढविण्यासंदर्भातील अहवाल सादर करा, कालव्याचे पाणी शेवटपर्यंत पोहचण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याची सविस्तर टिपणी सादर करावी, हरणबारी उजवा कालव्याला दोन महिन्यात प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावेत अशा सुचणा यावेळी नामदार दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.
केळझर चारी क्रमांक ८ चे काम धिम्या गतीने सुरू आहे. ठेकेदार या कालव्याचे काम निर्धारित वेळेत पुर्ण करणार नसेल तर त्याच्या वर गुन्हे दाखल करून तातडीने दंडात्मक कार्यवाही करावी अशा सुचणा देखील लाभांश शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ना.भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.
गिरणा, आरम, मोसम नद्यांवर लवकरात लवकर केटीवेअर बांधण्याचे काम सुरू केले जाईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांच्या वतीने शेतकरी व नामदार भुसे यांना यावेळी देण्यात आली.
बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्पांबाबत शासनाची अनावस्था आहे अशी खंत आमदार दिलीप बोरसे यांनी यावेळी व्यक्त केली. सिंचन प्रकल्प कार्यान्वित झाले तर बागलाणचा शेतकरी सुजलाम सुफलाम होईल यासाठी शासनाने सिंचन प्रकल्प पुर्ण करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे मतही यावेळी आमदार बोरसे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांबद्दल जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार, माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पूतात्या बच्छाव, पंचायत समितीचे माजी उपसभापती कान्हु आहिरे, बाजार समितीचे संचालक कृष्णा भामरे, संघर्ष समितीचे दिनेश देसले, किशोर ह्याळीज यांनी अपुर्ण सिंचन प्रकल्पांची रखडलेली कामे व त्यांना येत असलेल्या अडचणी लक्षात आणून दिल्यात.
बैठकीला पाटबंधारे विभागाचे प्रकल्प अधिक्षक अभियंता एस. एस. खांडेकर, गिरणा खोरे प्रकल्प विभाग कार्यकारी अभियंता आर. ए. पाटील, लघुपाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता अभिजीत साहाणे, कार्यकारी अभियंता संदीप पवार, सहाय्यक अभियंता अभिजित रौंदळ, उपअभियंता अविनाश कापडणीस, उपअभियंता कोळगे, कृषीअधिकारी सुधाकर पवार, शाखा अभियंता अशोक शिंदे यांच्या सह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम