देवळा प्रतिनिधी : युवकांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय ज्ञानभाषेवरील प्रभुत्व, सहनशीलता व मेहनतीची तयारी अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे मुख्य समन्वयक योगेश पाटील यांनी केले. देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामेश्वर गावचे माजी उपसरपंच व युवा उद्योजक विजय पगार तर मुख्य समारोपक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व देवळा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि माझी वसुंधरा अभियान या उपक्रमांतर्गत विविध कामे पूर्ण करण्यात आली.
स्वयंसेवकांच्या दैनंदिन कार्यक्रमात दररोज सकाळी व्यायाम, श्रमदान, दुपारनंतर वैचारिक प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम असे नियोजन करण्यात आले.
शिबिर कालखंडात स्वयंसेवकांनी श्रमदान करून डॉ.दौलतराव आहेर उद्यानातील सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती व स्वच्छता, स्मशानभूमी परिसर स्वच्छता, सहस्त्रलिंग मंदिर परिसर स्वच्छता, कोलथी नदीपात्रातील पाण्याच्या टाक्याची स्वच्छता,रामेश्वर ते सहस्त्रलिंग रस्त्याच्या साईड पट्ट्यांची दुरुस्ती अशी कामे केली. एक दिवस गावातील सर्व कुटुंबांची विचारपूस करून कोव्हीड लसीकरणासंबंधी माहिती जाणून घेतली.
शिबिर काळात वैचारिक प्रबोधना मध्ये महिला सक्षमीकरण, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शासकीय योजना, कोरोना घ्यावयाची काळजी, ग्राम सर्वेक्षण, पर्यावरण व आपले कर्तव्य इत्यादी विषयावर मान्यवरांचे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य समारोपक प्राचार्य मा. हितेंद्र आहेर यांनी शिबिर काळात केलेल्या कामांबद्दल सर्व स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकाऱ्यांचे कौतुक करून सहकार्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानले.
शिबिर काळात उत्कृष्ट काम करणारे स्वयंसेवक गटनेते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय संबोधनात विजय पगार यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना श्रमाबरोबरच संस्कार जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करुन पालकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी गोविंद पगार सर, देवस्थानचे विश्वस्त पोपट पगार सर, मुख्याध्यापक अहिरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.श्वेता शिंदे यांनी केले. शिबिर काळातील अनुभव ऋत्विक काकवीपुरे, मयुरी भदाणे, मानसी जाधव, रोहिनी पगार, मृणाल निकम, अक्षदा आहेर यांनी मनोगतातून व्यक्त केले. कु.मृणाल निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
संपूर्ण शिबिर यशस्वी करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक व कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. के. आहेर, डॉ.जयमाला चंद्रात्रे, प्रा.राकेश घोडे, ए. एस. गुजरे, यु. के. शेळके, आर. एन. शिरसाठ, एन. वाय. पाटील, बाबाजी आहेर व संजीव आहेर यांनी मोलाचे सहकार्य केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम