मुजरा राजं मुजरा….!

0
44

नेहमी वाटतं राजं…. की आजच्या या आधुनिक युगात जन्माला न येता सोळाव्या शतकाच्या सुवर्ण युगात जन्माला आलो असतो तर जीवनाचं अगदी सोनं झालं असत बगा…!

हाडा मांसाच शरीर जरी नसत मिळाल तर अगदी सह्याद्रीचा दगुड बी झालो असतो पण तुमचं ते तेजस्वी अन् ओजस्वी रूप याची देही याचि डोळा बघता आल असतं, राजं…. या कानांनी ऐकल असते शिवनेरी चे नगाडे आणि जिजाऊ साहेबांनी अंगाई…पाहिली असती की आपल्या स्वराज्याची ती मुहूर्तमेढ….ऐकली असती रायरेश्वराच्या गाभाऱ्यातील तुमची ती अमोघ वाणी.. साठवल असत की या डोळ्यांमधी तो श्रीमान रायगडचा दैदिप्यमान सोहळा….
व्हय राजं,… म्या बी बघितल असतं की या डोळ्यांनी…. माझ्या राजा म्होर झुकलेल्या त्या गर्विष्ट माना…

अस वाटण्या मागची कारण ही खूप हाईत राजं…
कारण तुमच्या या स्वराज्यात आता रांझ्याच्या पाटलाला सजा नाही होत राजं…त्याच पाप लपवण्यासाठी त्याला वकील दिला जातो..व्हय राजं…तुम्ही व्हता म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून बी स्वराज्यात सुरक्षित राह्यली. पण आज आपल्या स्वराज्याच्या लेकी बी सुरक्षित न्हाई राजं…
कुनब्याच्या शेतातील काडीच बी नुकसान बघणारी तुमची मावळे नाहीत राजं आता.. आता तर त्यांना त्यांच्या जिवाचं बी मोल न्हाई… न्याय मागण्याबिगर शेतकरी जीव देणं पसंद करतो… अन्नदाता शेतकरी राजं…, उपाशी राहून आपलं गाऱ्हाणं मांडतो राजं उपाशी राहून गाऱ्हाणं मांडतो…

चलन बदललं तस माणसं बी बदलली बघा..तुमची राजमुद्रा अगदी गळ्यात अन बोटात सोन्याचांदीत आली..पण अमलात आणायची तेवढी राहिली बघा…
आऊसाहेबांची जयंतीला आम्ही जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकी होतो राजं..पण पोटात आम्ही किती जिजाऊ मारतोय याच भान न्हाई आम्हाला राजं…
एवढी वर्ष गेलीत तवा कुठं आम्हाला धर्मवीर शंभूराजं समजले राजं…पण माझी येसूबाई अन् ताराराणी अजून बी न्हाई कळली राजं…..
दुर्ग – दुर्गेश्वर रायगड बांधून मोबदला, फक्त विटेवर नाव मागणारे हिरोजी इंदुलकर बी फकस्त…तुम्ही जोडू शकले राजं….आज सिमेंट मधी जान आली बघा..पण आज हिरोजींच्या ईमानमधी जान न्हाई राह्यली…. राजं…

रायगडी तुमच्या समाधीस्थळी आजही तुमचा भास होतो राजं…तेथील वाहणाऱ्या हवेतून तुमचा मायेचा हात आजही स्पर्श करतो राजं.. आज थकलेल्या आणि हरलेल्या प्रत्येक मनाला तेथून एक नवीन ऊर्जा मिळते राजं….ती ऊर्जा असते

नवनिर्मितीची, अस्तित्वाची, स्वाभिमानाची, धर्मरक्षणाची..आणि हरलेल्या मनातून एकच वाक्य येते..
शिवबा कशास्तव कसे जगले स्मरूया।
शिवसूर्यमार्ग विजयार्थ उठा धरूया।।
मनीषा अपूर्ण परिपूर्ण करावयास।
विजयी रणांत करूया भगव्या ध्वजास।।
आज झुकणाऱ्या प्रत्येक मस्तकाला हाच आशीर्वाद हवाय राजं….तुमचं तेज, तुमचं चैतन्य , तुमचा पराक्रम,तुमचं साहस सगळ्यांच्या अगदी नसानसांत भीनु द्या राजं…..
मुजरा राजं मुजरा..

लेखन कमलेश उगले


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here