द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या (Corona) नव्या ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाशिक महापालिका (Nashik NMC) हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने (BMC ) पहिली ते चौथीचे वर्ग तुर्तास सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत झालेल्या बैठकीत पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नाशिकनंतर आता पुणे, मुंबई, औरंगाबादमध्येही १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार नाही.
मुंबई महापालिकेने 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद शहरातील शाळा सुरू होणार नाहीत. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली. पुणे महानगरपालिकेने पहिली ते आठवीची शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या निर्णयाच्या आधारे प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार नसून, येत्या दहा-बारा दिवसांमध्ये यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
शाळा सुरु करण्याबाबत या मार्गदर्शक सूचना
शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-19 साठीची 48 तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी.
विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे.
शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल.
शिक्षक-पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात.
शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.
विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे.
शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात.
जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात.
विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग चाचणी घेण्यात यावी.
सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक व मदतनीस यांचे 100 टक्के लसीकरण झालेले असावे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम