महिला वारकऱ्यांना वारीदरम्यान सॅनिटरी नॅपकीन, शौचालय, स्त्रीरोग तज्ज्ञ सेवा पुरवली जाणार ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

0
67

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारमधील महिला आयोगामार्फत आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळेस महिला वारकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षेकरीता नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. या निर्देशांनुसार आता वारीच्या काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांकरिता शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था  करण्यात येणार आहे. तसेच सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन त्या ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या स्वाक्षरीने पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात यासंदर्भातील निर्देश वारी ज्या जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करते त्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे.

पत्रात काय आहे?

“महाराष्ट्र राज्यास वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू/आळंदी/पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते,” असा उल्लेख या पत्रात आहे.

कोणत्या सुविधा देण्यात येणार आहेत?

वारकरी महिलांची संख्या पाहता त्यांच्याकरीता मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारने निर्देश जारी केले आहेत. यामध्ये खालील चार निर्देश देण्यात आलेत…

१. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी.

२. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असणे आवश्यक आहे.

३.स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

४.महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावावेत.

अशा सुविधा या वर्षीच्या वारीपासून महिला वारक-यांना उपलब्ध करून दिल्यास, पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु होण्यास मदत होईल, अशी आशा महिला आयोगाने या पत्रामधून व्यक्त केलीय.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here