नवी मुंबई:
वेगळ्या बांधकाम शैलीमुळे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या बेलापूरच्या आयकर कॉलनीची ओळख काहीशी पुसली जाणार आहे. येथील जीर्ण झालेल्या ४० इमारती अखेर जमीनदोस्त झाल्या आहेत. वापर नसल्याने या इमारतींमध्ये गर्दुल्ले, चोर यांच्या वावर वाढून बेकायदा व्यवहार वाढू लागले होते. त्यामुळे अन्य इमारतींमध्ये राहात असलेल्या आयकर विभागातील अधिकारी, कर्मचारी, रहिवाशांना या ठिकाणी राहणे कठीण होत चालले होते. तसेच, या निसर्गसंपन्न परिसरातील वसाहतीचा बकालपणा वाढू लागला होता. त्यामुळे आयकर विभागाने या जीर्ण इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. या जागी दुसऱ्या इमारतींची उभारणी केली जाणार आहे.
पारसिक हिल डोंगररांगाच्या कुशीत वसलेल्या बेलापूर सेक्टर २१ आणि २२मध्ये सिडकोने १९९६मध्ये आयकर या केंद्रीय शासन आस्थापनाला ‘ए’ टाइप आणि ‘सी’ टाइप इमारती विक्रीने दिल्या. सुरुवातीला येथे आयकर विभागाचे कर्मचारी निवास करत होते. मात्र येथील इमारतीच्या बांधकामाच्या तक्रारी वाढू लागल्याने दहा वर्षांपूर्वी येथील कर्मचारी राहते घर सोडून इतरत्र निघून गेले. मात्र लाल रंगाच्या आणि वेगळ्या बांधकाम शैलीच्या या लहानसहान इमारती, घरे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असत. हा परिसर गर्द हिरवाईने नटलेला आहे. त्यात लोक निघून गेल्याने इमारती ओस पडल्या. इमारतीभोवती झाडेझुडपे, गवत वाढले. त्यामुळे साप आणि इतर प्राणी यांचा वावर वाढला. याचाच फायदा काही अनैतिक घटकांनी घेतला आणि त्यामुळे या ठिकाणी भिकारी, गर्दुल्ल्यांचा वावर वाढला. त्यातून येथे अनैतिक प्रकारही वाढले. भंगार चोर दिवसाढवळ्या इमारतीत शिरकाव करून लाकडी दरवाजे, खिडक्या, लोखंड, नळ आदी वस्तू घेऊन पसार होत होते.
या घटकांचा त्रास आयकर कॉलनीतील ‘बी’ टाइप, ‘डी’ टाइप आणि ‘एफ’ टाइपमधील नागरिकांना होत होता. रात्रीच्या वेळी चोरी होण्याचे प्रकारही वारंवार घडत होते. हा परिसर गर्द झाडीने वेढलेला असल्याने साप, विंचू, अजगर आदींची भीती स्थानिकांना होती. येथील इन्कम टॅक्स वसाहत संबंधित प्रशासनाने आता पूर्णतः जमीनदोस्त केल्याने या लाल इमारती आता येथून नाहीशा झाल्या आहेत. आता येथे आणखी काही इमारती आहेत, ज्या चांगल्या स्थितीत आहेत. तिथे राहणाऱ्या रहिवाशांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम