द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचा आज ६५ वा महापरिनिर्वाण दिन असून यानिमित्ताने फक्त महाराष्ट्र नाही तर जगभरातील अनुयायी दादरमधील चैत्यभूमीवर येत असतात. दरम्यान करोना संकट असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र यावरुनच चैत्यभूमीवर नाराज कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
अनेक अनुयायी आदल्या दिवशीच दादरमध्ये येऊन थांबत असतात. मात्र यावेळी कोणत्याही सोयीसुविधा नसल्याने संतप्त अनुयायांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसंच करोनाच्या पार्श्वभूमीवर अभिवादनासाठी आत प्रवेश दिला जात नसल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच राजकीय नेते थेट येऊन दर्शन घेत आहेत, त्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्तेदेखील त्यापद्धतीने दर्शन घेत आहेत. मग सामान्य माणसाने का रांगेत येऊन दर्शन घ्यावे या निषेधार्थ काही तरुणांनी घोषणाबाजी सुरु केली. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही खाली पडले. यानंतर काही अनुयायांमध्येच तसंच पोलिसांसोबत झटापट झाली. पण काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान हे तरुण केवळ स्टंटबाजी करत असल्याचं तेथील आयोजनकर्त्यांचं म्हणणं आहे.
महापरिनिर्वाण दिनी अनेकजण राज्याबरोबरच देशातील वेगवेगळ्या भागांमधून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतात तेव्हा ते दादर स्थानकामध्येच उतरतात. त्यामुळेच या स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम आर्मीने आंदोलन करुन ही मागणी पुन्हा केल्याचं पहायला मिळालं.
भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आधी दादर स्थानकासमोर आंदोलन केलं. त्यानंतर ‘जय भीम, जय भीम’, ‘ नामांतरण झालंच पाहिजे झालंच पाहिजे’, ‘होतं कसं नाय झालंच पाहिजे’ अशा घोषणा देत भीम आर्मीचे कार्यकर्ते दादर स्थानकामध्ये शिरले. सुरुवातीला पोलिसांनी त्यांना विरोध केला. मात्र परिस्थिती चिघळू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवत आंदोलकांना दादरस्थानकावरील ब्रिजवरुन घोषणाबाजी करत चालत जाण्यासाठी परवानगी दिली. आंदोलकांनी पोलीस बंदोबस्तामध्येच हातात नामांतरणाच्या मागणीचे पोस्टर्स पकडून घोषणाबाजी करत नामांकरण तातडीने करण्यासंदर्भातील पावले उचलावीत अशी मागणी केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम