
देवळा प्रतिनिधी : ग्राहकांची फसवणुक होण्याच्या घटना वाढत आहेत. परंतु ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ग्राहकांना फारशी माहीती नसल्याने फसवणुक झाल्यावर काय करावे ? याबाबत असलेल्या अज्ञानामुळे तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत नाही.

ग्राहकांना उत्पादन व बाजारपेठेबाबत साक्षर करण्यात ग्राहक पंचायत मोलाची भुमिका बजावु शकते असे प्रतिपादन तहसिलदार विजय सुर्यवंशी यांनी केले. यावेळी शहरातील जुने तहसिल कार्यालय, व नवीन प्रशासकीय इमारतीत ग्राहक पंचायतीचे सदस्य, व शासकीय अधिकारी यांच्या नावांचा व मोबाईल नंबर असलेला फलक दर्शनी भागात लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पिडीत ग्राहकांना तक्रार देण्यासाठी संपर्क साधणे सुलभ होणार आहे.
येथील नवीन प्रशासकीय कार्यालयात तहसिलदार विजय सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत जागतिक ग्राहकदिन साजरा करण्यात आला. यावेळी देवळा तालुका ग्राहक पंचायतीचे संघटक संजय मांडगे, सहसंघटक संजय देवरेे, संजय भदाणे, शशिकांत चितळे, सचिन अहेर, राजपाल आहीरे, बाबा पवार आदि ग्राहक मंचचे सदस्य उपस्थित होते. यावेळी मुद्रांक विक्रेते, दुकानदार, आदींकडुन ग्राहकांची विविध प्रकारे होणारी अडवणुक व फसवणुकीबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीस नायब तहसिलदार विजय बनसोडे,दुय्यम निबंधक आर.एम. दोंदेे, विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नरवणे, पुरवठा विभागाचे भामरे,स्वस्त धान्य दुकानदार संजय आहेर आदी उपस्थित होते.
24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा झाल्यानंतर ग्राहकांना योग्य ते संरक्षण मिळाले.परंतु ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांची फारशी माहिती नागरीकांना नाही.वस्तुत केलेली भेसळ, कालबाह्य झालेल्या वस्तु, भुलवणा-या जाहिराती आदिंद्वारे ग्राहकांची फसवणुक होत असते. सद्या किराणा दुकानात खाद्यतेल, डाळी आदी पदार्थाच्या किंमतीत अचानक मोठी वाढ होत असल्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत, परंतु या भाववाढीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याबद्दल ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली व याबाबत योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली.
ग्राहकांनी वस्तु घेतांना जागरुक राहुन तिचा दर्जा तपासुन घ्यावा तसेच पक्के बिल घेउन ते सांभाळुन ठेवावे.यामुळे फसवणुक झाल्यास कायदेशीर लढाई लढवणे सोपे होते.फसवणुक झाल्यास ग्राहक मंचशी संपर्क साधावा. – संजय मांडगे (संघटक ,देवळा तालुका ग्राहक पंचायत )
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम