स्वप्निल अहिरे,
सटाणा प्रतिनिधी : बागलाण तालुक्याचे आराध्या दैवत असणाऱ्या, देवमामालेदारांचा उत्सव परंतु त्यावरही शासनाचे निर्बंध. त्या एका सत्पुरुषाने कायद्याच्या विरुद्ध जाऊन गरीब गरजू लोकांना दुष्काळात सरकारी खजिना वाटला, आज त्याच महापुरुषाच्या १०० वर्षाच्या रथोत्सवाला कायदा आड येत आहे.
कायदा म्हणतो की गर्दी होईल. गर्दी सभेंची चालते, शक्ति प्रदर्शनाच्या मिरवणुकीची चालते, अगदी सिनेमाची सुद्धा चालेल, अगदीच आता तर घोडा शर्यत देखील चालेल. लोक तिथे मांडीला मांडी लावून बसलेले असतात. आम्हाला ती सर्व चालेल, पण शंभर वर्षांचा वारसा असलेल्या रथ मिरवणुकीला मात्र गर्दी होईल हे कारण म्हणजे हास्यास्पद म्हणावे की दुःख दायक. कुठल्याही एका परंपरेला १०० वर्ष पूर्ण झाली तर तो जागतिक वारसा गणला जातो.
बाहेरील देशात, बाहेरीलच कशाला खुद्द आपल्या देशात फक्त ५० वर्षे पूर्ण झालेल्या राष्ट्रीय वारसा असलेल्या परंपरा धामधुमीत साजर्या केल्या गेल्या पण आम्हाला मात्र गर्दी दिसत आहे. इतिहासात डोकावले तर ब्रिटिश काळात महाराष्ट्र प्रांताचा तत्कालीन गव्हर्नर यशवंतराव महाराजांची मिरवणूक काढतो, अशा काळात जेथे धार्मिक सण साजरा करायला परवानगी घ्यावी लागतेय ही शोकांकिकाच म्हणावी लागेल. आता तर स्वातंत्र मिळून ७५ वर्षे झाली. आपण तर अमृत महोत्सव साजरा करतोय तरीही एवढा मोठा वारसा आपण खंडित करत आहोत. किती मोठे दुर्भाग्य? एका अधिकारी व्यक्तीच्या रथोत्सवाला कायदा नकार देत आहे ?
सटाणा ग्रामवासी अधिकाऱ्यात देव बघतात. रथ निघणे ही शंभर वर्षांची भावना आहे. जणू तो एक सण आहे. संपूर्ण सटाणा ग्रामवासी मास्क लावतील, नियम पाळतील, गर्दी टाळतील पण कृपया रथ निघू द्या हो….! महाराजांचा रथ जेव्हा घरावरून जातो तेव्हा दिवा सुहासिनी वर्ष भराच्या ईच्छा त्या माऊली समोर सांगत असतात. एक मनोमन विश्वास असतो की ईच्छा पुर्ण होणार. २ वर्षाच्या त्या ईच्छा मन पोखरत आहे. रथा समोर आर्त मन करून सर्व लोक बघत असतात. कित्येकांचे डोळे पाणावतात सुद्धा. कोणाला महाराजांच्या मध्ये आई, वडील, आजोबा, काका, भाऊ, गुरु अशी असे रूपे दिसत असतात. मनोमन सुखाने भिजतो ओ तो भाविक. तो लाकडी फुलांनी सजवलेला रथ जेव्हा गल्लीतून धाडधाड चालतो तेव्हा जणू असे वाटते की स्वर्गातील ऐरावत सुखाचा वर्षाव करतो आहे.
पाहिल्या-दुसर्या लाटेत बागलाण वासियांनी खूप जवळची लोक गमावली. ते दुःख मनाच्या कोपर्यात कधीचे साठवून ठेवले आहे. महाराजांना बघतांना त्या दुःखाचा बांध फुटणार आहे. कृपया रथ निघू द्या हो….
महाराज धंदा होऊ द्या, महाराज पोराला यंदा नोकरी लागू द्या, महाराज शेतात सुगीचे दिवस येऊ द्या, महाराज पोरीचे लग्न जमू दया असे तळमळीचे आर्त स्वर कानी पडणार आहेत.
महाराज…महाराज …महाराज.. महाराज…अशा कितीतरी इच्छा लोकांना मांडायच्या आहेत हो रथा समोर…कृपया रथ निघू द्या..
महाराज कृपा करा त्यांना सद्बुद्धी द्या…रथ निघू द्या…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम