– राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत टाकेद बु येथील बांबळेवाडीत १ मे महाराष्ट्र दिनी ग्रामसभा घेण्यात आली. सकाळी आठ वाजता ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र ध्वज पूजन करून ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर दहा वाजता बांबळेवाडी येथे ग्रामसभा घेण्यात आली.
सभेच्या सुरुवातीला उज्वला दिनानिमित्त धामणगाव येथील ईश्वरी गॅस एजन्सीचे किसन गाढवे यांनी ग्रामस्थ महिलांना इंधन बचत,गॅस सिलेंडरचा योग्य वापर,किचन ओटा आणि गॅस,रेग्युलेटर आणि गॅस नळी यासंदर्भात जनजागृती मार्गदर्शन पर माहिती दिली.
ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्षांची परवानगी घेऊन ग्रामसभेला सुरुवात केली.ग्रामविकास अधिकारी यांनी मागील तहकूब झालेल्या ग्रामसभेतील विषय मांडले. त्यानंतर रतन बांबळे यांनी कोरम पूर्ण झाल्याशिवाय ग्रामसभेला सुरुवात करू नये असे सुचविले.ग्रामसभेला किती ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहे याचा ठराव घेण्यात यावा असे माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे यांनी सुचविले त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या घेऊन कोरम पूर्ण झाल्यावर ग्रामसभेला बांबळेवाडी येथील सभामंडपात सुरुवात करण्यात आली.ग्रामसभेच्या सुरुवातीलाच बांबळेवाडीतील सर्वच महिलांनी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांना घेराव घालत पाणी टंचाई,पाणी प्रश्नांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली.
सर्वतीर्थाना टाकेद क्षेत्री बोलावून जिवंत पाणी आणले आणि भक्तराज जटायुला प्रभू श्रीरामांनी मोक्ष दिला आणि त्याच सर्वतीर्थ टाकेद गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हातान्हात रानोमाळ डोक्यावर हंडा घेऊन फिरावे लागते हे दुर्दैव आहे कोणताही विकास नाही झाला तरी चालेल पण आम्हांला हक्काचं पाणी घरापर्यंत नळाद्वारे मिळाले पाहिजे,आठ आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो पाण्यासाठी रात्रंदिवस महिलांना संघर्ष करावा लागतो असा सवाल बांबळेवाडीतील महिलांनी यावेळी एकच गर्दी करत केला. जवळपास वीस पंचवीस मिनिटे बांबळेवाडीतील महिलांनी पाणी प्रश्नावरून ग्रामपंचायतवर प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर जोपर्यंत पाणी प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत एकही लोकप्रतिनिधींने वाडीत यायचं नाही असा सवाल सर्वच तरुण, जेष्ठ,ग्रामस्थांनी उभा केला.
येत्या आठ दिवसांच्या आत बांबळेवाडी येथे लोखंडी पाईपलाईन सह प्रत्येक कुटुंबाला घरपोहच नळ कनेक्शन देऊन पाणी देण्यात येईल जर ग्रामपंचायतकडून असे नाही झाले तर बांबळेवाडी येथे सरपंच सह कुणालाही येऊ देऊ नका असे आश्वासन ग्रामपंचायतच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे यांनी सर्व महिला तरुण युवक ग्रामस्थांना आश्वासन दिले.यानंतर एकच शांतता पाहायला मिळाली.एकट्या बांबळेवाडीसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत साडेसात लाखांची योजना मंजूर असून एक कोटी रुपयांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम पण पूर्णत्वास आले आहे अशी माहिती उपसरपंच रामचंद्र परदेशी यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांना दिली.यानंतर ग्रामविकास अधिकारी भामरे यांनी घरकुल ड पत्रक यादी वाचून दाखवली यावर ग्रामस्थांनी एकच हल्लाबोल केला. गोरगरीब या योजनेपासून वंचित असून ज्यांना गरज नाही त्यांना या यादीत लाभार्थी म्हणून पहिले प्राधान्य देण्यात आले आहे असा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला.
यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत बांबळेवाडी,घोडेवाडी, शिरेवाडी आणि टाकेद गावचा ठराव,नाबार्ड अंतर्गत कामे,एम आर जी एस अंतर्गत कामे,पाणलोट क्षेत्र विकास योजना,किसान क्रेडिट कार्ड,इ श्रम योजना,दलित वस्तीतील कामे,के वाय सी कॅम्प ची ग्रामस्थांनी मागणी केली. नवीन सुधारित शिवार रस्ते,वृक्षारोपण कार्यक्रम,भूमिगत गटार, पाईपलाईन, काँक्रीट रस्ता,वॉल कंपाऊंड आदी नवीन व जुन्या कृती आराखड्यातील विषय वाचून दाखविण्यात आले.यानंतर बांबळेवाडी सह घोडेवाडी शिरेवाडी या तीनही वाड्यांचा पेसामध्ये पहिल्यांदा समावेश करण्यात आला असून लोकसंख्येनुसार दर वर्षी वाड्यांसह टाकेद ग्रामपंचायतला अधिकचा पेसा निधी उपलब्ध होईल असे ग्रामविकास अधिकारी भामरे यांनी सांगितले.यानंतर विविध विकास कामे आणि त्यांचे ठराव घेण्यात आले.यावेळी सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, ग्रामपंचायत सदस्य सतिष बांबळे,विक्रम भांगे,केशव बांबळे, सुशीला भवारी,लता लहामटे,नंदाबाई शिंदे,भीमाबाई धादवड,डॉ श्रीराम लहामटे,पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड आदींसह अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा कर्मचारी ,पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षक विविध कर्मचारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम