द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पूर्वनिर्धारित मुदतीच्या ५ वर्षे आधी म्हणजेच २०२५-२६ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचा वापर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास हिरवा कंदील दिला आहे. यापूर्वी यासाठी २०३० हे लक्ष्य ठेवण्यात आले होते. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलची भेसळ केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जैवइंधन आधारित राष्ट्रीय धोरणामधील सुधारणांना मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत इथेनॉलचे पेट्रोल मधील वापर वाढणार आहे. यासोबतच उत्पादन वाढवण्याकरिता आणखी अनेक पिकांच्या वापरास मान्यता देण्यात आली आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातर्फे २००९ मध्ये राष्ट्रीय जैवइंधन धोरण लागू करण्यात आले होते. नंतर, ४ जून २०१८ रोजी या मंत्रालयाने जैवइंधनावरील राष्ट्रीय धोरण २०१८ अधिसूचित केले. आता मोदी सरकारने पुढील २ वर्षात पेट्रोलमध्ये २० % इथेनॉल मिसळण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे महागड्या कच्च्या तेलाच्या आयातीच्या बाबत मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
जैवइंधन धोरणात मंजूर केलेल्या प्रमुख सुधारणांमध्ये विशेष प्रकरणांमध्ये जैवइंधनाच्या निर्यातीला परवानगी देण्याचा समावेश असून, यासोबतच ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पाअंतर्गत देशात जैवइंधन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. विशेष आर्थिक क्षेत्रे किंवा निर्यात करणाऱ्या घटकांकडून याला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम