नाशिक प्रतिनिधी : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भापजला नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकांत घवघवीत यश मिळाले आहे. आज लागलेल्या निकालांवरुन पुन्हा एकदा केदा आहेर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे. विशेषतः बालेकिल्ला असणार्या देवळा नगरपंचायतवर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. यामुळे अनेक ठिकाणी महाविकास आघाडी तर राष्ट्रवादी-शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेस, काँग्रेस-शिवसेना अशा आघाड्याही पाहायला मिळाल्या. मात्र, भाजप आणि मित्रपक्ष यांनी सोबत निवडणुका लढविल्या.
आज लागलेल्या निकालातून नाशिक जिल्ह्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आहे. भाजपला विजयाच्या अग्रस्थानी ठेवण्यासाठी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी कार्यकर्त्यांची वज्रमूठ बांधली होती. त्यानुसार निवडणुकीचे बिगुल वाजल्याच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक रणनीती आखली. त्याचा परिपाक म्हणून शेवटच्या दिवसापर्यंत मतदारांच्या संपर्कात राहून विश्वास देण्यात यशस्वी झाले.
या संपूर्ण धामधुमीत बालेकिल्ला असणार्या देवळ्यात तर केदा आहेरांनी तळच ठोकला होता. कायमच एकहाती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जंग जंग पछाडली होती. अखेर आज लागलेल्या निकालातून एकहाती वर्चस्व मिळाले असले तरी सतरा जागांपैकी दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. परंतु, यावरुन मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. याचबरोबर जिल्ह्यातील इतरही नगरपंचायत-नगरपरिषदांमध्ये भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. भाजपसाठी ही आनंदाची बाब असून, कार्यकर्त्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे. एकूणच जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यापासून केदा आहेरांनी आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे अधोरेखित होत आहे.
जिल्ह्यात एकूण 102 जागांपैकी 30 जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर 28 जागा मिळवत राष्ट्रवादीने यश संपादन केले. शिवसेना -25 काँग्रेस-06 माकप-05 मनसे-01 बसप-01 निफाड शहर विकास आघडी- 4 अपक्ष- 2 जागांवर विजय झाले. जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला निफाडमध्ये खातेही उघडता आले नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम