पांढऱ्या सोन्याचे भाव गडगडले

0
15
Cotton Bolls Field

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: शहरातील कापसाच्या बाजारपेठेत ऑक्टोबर महिन्यात ९ हजार रुपयांपर्यंत भाव गाठलेल्या कापसाच्या भावात मागील काही दिवसांत सतत घसरण होत आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून ७ हजार ९०० ते ८ हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कापसाची खरेदी करण्यात येत असल्याने गरजेपोटी १ हजार रुपयांच्या तफावतीने पांढरे सोने विकावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अंबड तालुक्यात अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे कापसाचे पीक हातचे गेले आहे. थोड्याफार प्रमाणात शेतात शिल्लक असलेल्या कापसाला अचानकपणे झळाळी मिळल्यागत ९ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढेल म्हणून कापूस घरातच साठवून ठेवला आहे. परंतु ९ हजार रुपये क्विंटल झालेले भाव काही दिवसांत ८ हजारांपर्यंत खाली आले आहेत. १५ दिवसांत १ हजार रुपयांचा क्विंटलमागे तोटा होणे हे नक्कीच शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा भाव आहे.

शेतकरी दरवर्षी नगदी पीक म्हणून कापसाचे उत्पादन घेत असतो. परंतु ऐन कपाशीला कैऱ्या लागण्याच्या काळातच सततधार पावसाने सुरुवात केल्याने कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जमा झालेले पाणी दिवसरात्र एक करून अक्षरशः मोटारीद्वारे बाहेर काढले. मात्र, कपाशी पीक वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून थोडेफार पीक का होईना मात्र हाती अणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातही एकाचवेळी कापूस सर्वांचा कापूस फुटल्याने वेचायलाही मजूर सापडत नसल्याने शेतकऱ्यांनी मजुराला जास्तीचे पैसे देऊन कापूस घरात आणला आहे.

ज्या ठिकाणी एकरी ८ क्विंटल कापूस व्हायचा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना २ ते ३ क्विंटलवरच समाधान मानावे लागले आहे. दिवाळी दसऱ्याच्या मुहूर्तावर खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला पाच हजार रुपये प्रति क्विंटल खरेदी होणाऱ्या कापसाचे भाव अचानकपणे ऑक्टोबर महिन्यात ९ हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे भाव जास्तीचे वाढतील या आशेने कापूस घरातच साठवून ठेवल्याने आता शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
९ हजारांवर गेलेले कापसाचे भाव अजून वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. मात्र, भाव दिवसेंदिवस १०० ते २०० रुपयाने कमी होत आहेत. घरात असलेल्या मालाला भाव मिळत नाही. मात्र, विकल्यावर शेती मालाचे भाव वाढतात, शेतकऱ्यांना दरवर्षी कपाशीच्या भावात चढउतार पहावयास मिळत आहेत. व्यापारी जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या मालाचे भावात गफलत करत आहेत. – पांडुरंग गटकळ, जिल्हा सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here