परळी वैजनाथ येथील मंदिराला आरडीएक्सचा धोका

0
8

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील परळी येथील वैजनाथ मंदिर (Parali Vaijanath Temple) समितीच्या अध्यक्षांना आलेल्या धमकीच्या पत्रामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. “वैजनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आले आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा RDX ने मंदिर उडवून देवू”, अशा आशयाचे आलेले पत्र आहे. वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांना हे पत्र प्राप्त झाले आहे. याबाबत परळी शहर पोलीस ठाण्यात (Beed Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मंदिर परिसराच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

पत्रात म्हटले आहे की, आपण फार मोठ्या मंदिर संस्थानाचे विश्वस्त आहात. आत्तापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ रक्कम देणगी रुपाने मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तुलधारक आहे. मला 50 लाख रुपयांची तातडीने गरज आहे. हे पत्र मिळताच दिलेल्या पत्त्यावर रक्कम पोच करावी, अन्यथा मी वैजनाथ मंदिर माझ्याकडच्या RDX ने उडवेन. या पत्राच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातली सुरक्षा वाढवण्यासाठी मंदिर समितीने थेट मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे मागणी केली होती. यामुळे मंदिरास अतिरिक्त सुरक्षा दिली आहे.

याबाबत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत “कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रभू वैजनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही. वैजनाथ प्रभू दुःख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घेऊन परळीत अनादी काळापासून विराजमान आहेत. 50 लाख रुपयांची मागणी करून धमकी देणारे गजाआड दिसतील” यामुळे परळीतील नागरिकांनी व भाविकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, असा दिलासा मुंडे यांनी दिला आहे. शिवाय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, डीजीपी आणि बीड पोलीस अधीक्षक व दहशतवाद विरोधी पथकास माहिती दिल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे कळवले आहे.
मंदिराचे सचिव देशमुख हे मंदिरात आले असताना, टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहत होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. रतनसिंग रामसिंग दख्खने, रा.काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड या पत्त्यावरुन हे पत्र आले आहे.

परळी वैजनाथ हे देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक दिवसापासून बंद असलेलं हे मंदिर आता निर्बंध शिथिल झाल्याने खुले करण्यात आले आहे. मात्र, नेमकीच पिरिस्थिती रूळावर येत असतांना हे पत्र नेमके कोणी पाठवले? कोणी खोडसाळपणा तर केला नाही ना ? याचा तपास पोलीस प्रशासनाने लवकर लावावा, अशी देखील मागणी भाविकामधून होत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here