परमबीर सिंह यांचं आज निलंबन?

0
12

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर आज निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फाईलवर स्वाक्षरी केली असून यासंबंधी आजच आदेश दिला जाण्याची शक्यता आहे.

आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंह यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे. परमबीर सिंह यांनी नागरी सेवेच्या नियमाचं उल्लंघन केल्याने देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरोधात चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती.

याआधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाई असं सांगितलं होतं. “बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु आहे,” असं त्यांनी सांगितलं होतं.
मार्च २०२० मध्ये मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता असा गंभीर आरोप करत खळबळ माजवून दिली होती. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात अनेक तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असून सध्या ते जेलमध्ये आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे परमबीर यांना अटकेपासून संरक्षण
न्या. एस. के. कौल आणि न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने परमबीर यांच्या याचिकेवर राज्य सरकार, पोलीस महासंचालक संजय पांडे आणि सीबीआय यांना नोटीस जारी करून ६ डिसेंबपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितलं आहे. दरम्यानच्या काळात परमबीर यांनी तपासात सहभागी व्हावे आणि त्यांना अटक करण्यात येऊ नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

सहा महिने अज्ञातवासात
खंडणीच्या गुन्ह्यांत फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सुमारे सहा महिन्यांच्या अज्ञातवासानंतर अखेर गुरुवारी मुंबईत पोलिसांपुढे शरण आले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांची सात तास चौकशी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांना ६ डिसेंबपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्यानंतर सिंह यांनी आपण चंदिगडमध्येच असल्याचं सांगितलं. तसंच लवकरच मुंबईत तपास यंत्रणांपुढे हजर होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते विमानतळावरून थेट कांदिवली येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात सकाळी ११ च्या सुमारास हजर झाले होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here