नीरज चोपडाने सुवर्ण जिंकत संपवली भारताची १०० वर्षांची ऍथलेटिक्स मधील प्रतीक्षा

0
25

क्रीडा प्रतिनिधी : नीरज चोपडा हे नाव तसं फारश्या भारतीयांना परिचित नसेलही. कारण क्रिकेट वेड्या भारतात इतर खेळांकडे म्हणावं तसं लक्ष फार क्वचितच जातं. मात्र नीरज चोपडा या पठ्ठ्याने भारताच्या ऑलिम्पिक मधील एका शतका पासूनची प्रतीक्षा संपवली. 

भालाफेक प्रकारात नीरज चोपडा याने सुवर्ण पदक कमावत इतिहास रचला. नीरज चोपडा याने ऍथलेटिक्स मधील भारताची १०० वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपवत दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी थेट सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तसेच भारताचे हे या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक आहे.

हरियाणामधील पानिपत येथील नीरज चोपडा याने सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. वयाच्या १९ व्या वर्षी नीरज चोपडा हा भारतीय सेनेत दाखल झाला. २०१६ मध्ये पोलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील IAAF वर्ल्ड चॅम्पिअनशीप स्पर्धेत , निरजने ८६.४८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंतर निरजला सेनेत ज्युनिअर कमिशन ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळाली. त्यानंतर पुढे निरजने कधी मागे वळून पाहिले नाही.

२०१८ साली इंडोनेशिया मध्ये झालेल्या आशियाई खेळांमध्ये निरजने ८८.०६ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक मिळवले आणि तो आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू बनला. याआधी भारताला १९८२ साली भालाफेक मध्ये कांस्य पदक मिळालेले होते. मात्र निरजने सुवर्ण पदक मिळवून आपला वेगळा ठसा उमटवला आणि सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले.

नीरज चोपडा ची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. आणि त्याने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेत १३९ कोटी भारतीयांना अभिमानाने मान ताठ करायला लावली.

आज पार पडलेल्या अंतिम फेरीत नीरज चोपडा समोर अनेक दिग्गजांचे आव्हान होते. अंतिम स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला एकूण सहा संधी देण्यात आल्या होत्या. ज्यात नीरज चोपडा याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ८७ मिटरहून अधिक दूर भाला फेकत सुवर्णपदकाच्या शर्यतीत अग्रस्थानी विराजमान झाला. त्यानंतर निरजने पुढच्या प्रयत्नात ८७.५८ मीटर भाला फेकत आपली सुवर्णपदकाची पकड आणखीन मजबूत केली. इतर स्पर्धक देखील तितक्याच ताकदीने भालाफेक करत होते. मात्र सर्वच स्पर्धक आपल्या सहाही प्रयत्नांत नीरज चोपडाच्या पहिल्या

प्रयत्नातील अंतरापर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत.
नीरज चोपडा याने भारताचा ऑलिम्पिक मधील सुवर्ण पदकाचा तब्बल १३ वर्षांचा दुष्काळ संपवला. याआधी २००८ साली बीजिंग ऑलिम्पिक मध्ये भारताच्या अभिनव बिंद्रा याने शूटिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर आज नीरज चोपडा याने इतिहास रचत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
भारताने या ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसह एकूण ७ पदके मिळवली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here