द पॉईंट नाऊ ब्युरो : नाशिक येथे आज साहित्य संमेलनाची सांगता झाली, यात पुढील 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यातील उदगीर, लातुर येथे पुढील चार महिन्याच्या आत घेतले जाणार असल्याची महत्वाची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली.आज 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. यावेळी ठाले-पाटील यांनी ही महत्वाची घोषणा केली.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना ठाले पाटील म्हणाले, 94 व्या साहित्य संमेलनात 9 वर्षाच्या बालकापासून ते 88 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेत आपापल्या भूमिका निभावल्या. वयाच्या 88 व्या वर्षी रामदास भटकळ यांनी निमंत्रण स्वीकारलं आणी ते आले. अध्यक्ष जरी आले नाही तरी संमेलन सुखरूप पार पडले असा टोला जयंत नारळीकर यांना लगावला. भटकळ यांनी मात्र दिलेली जबाबदारी पार पाडली. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर वाढला आहे, असे ठाले पाटील म्हणाले.
शहरापासून दूर असलेल्या संकुलात साहित्य संमेलन गैरसोय न होता आयोजन समितीनं यशस्वीपणे पूर्ण केलं याबद्दल त्यांनी आयोजन समितीचे अभिनंदन केले. जसा शिवाजी महाराजांनी व्यवहारकोश तयार केला अगदी तसा मुख्यमंत्री असतांना यशवंतराव चव्हाण यांनीही केला. त्याचा आता किती उपयोग होतो हे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असेही ठाले पाटील म्हणाले.
शाईफेक झाली, त्याकडे दुर्लक्ष करा
गिरीश कुबेर यांच्या परिसंवाद कार्यक्रमात त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडकडून शाई फेक झाली. यावर बोलताना, ठाले पाटील म्हणाले, एखादी विपरीत घटना घडते, आणि आज ती घडली. पंरतु हे चालुच असते, समाजात सगळ्या व्यक्ती सहिष्णू नसतात.
साहित्य संमेलनात मंजूर ठरावांचा, महामंडळ पाठपुरावा करतो. त्यावेळेला आम्ही केलेल्या पत्रव्यवहाराकडे सरकारने लक्ष घालावं असे आवाहन त्यांनी केले. पाठपुरावा करताना खर्च करून कुठे राजकारण्यांच्या मागे फिरणार ? तितका पैसाही कुठून आणणार असा सवाल केला. ठराव ही भावना साहित्यिकांची, लोकांची आहे, त्यामुळे ठरावातील मराठी भाषिकांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवावे असे आवाहन त्यांनी केले. संमेलनात झालेल्या परिसंवादात शेतकऱ्यांच्या समस्यांवर, सहभागी पोटतिडकीने बोलले याचाही आनंद वाटल्याचे ठाले पाटील म्हणाले. व्यासपीठावरील मंत्र्यांनी शेतकऱ्यांची दाहकता सोडवावी. कारण तुम्हाला त्यांनीच विधानसभेत पाठवलंय हे विसरू नका. शासन आणि अधिकारी दोघेही मराठीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करित असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे मंत्र्यांनीच याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहन पाटलांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम