देवळा : जनजातीमधील धर्मांतर केलेल्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळता कामा नये, त्यांना जनजातीच्या आरक्षण सुचीमधून बाहेर काढण्यात यावे असे आग्रही प्रतिपादन जनजाती सुरक्षा मंचचे केंद्रीय समिती सदस्य हिम्मतसिंग तावड (राजस्थान) यांनी केले.
येथील बाजार समितीच्या आवारात रविवार (दि.२४) रोजी जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने आयोजित जिल्हा आदिवासी महा संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्र्यंबकेश्वर येथील महामंडलेश्वर देवबाप्पा महाराज हे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.
जनजाती सुरक्षा मंचचे जिल्हा संमेलन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाले. जवळपास सात तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी झाले होते. मंचचे जिल्हा संयोजक प्रवीण गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मालेगाव नाक्यापासून भव्य शोभायात्रा काढत संमेलनास प्रारंभ झाला. आदिवासी संस्कृती व्यक्त करणारी पारंपरिक नृत्ये यावेळी दाखवण्यात आले यावेळी तावड पुढे म्हणाले की, धर्मांतरीत व बोगस आदिवासींचे आरक्षण रद्द झाले तरच मूळ आदिवासीना न्याय मिळेल. अनुसूचित जमातीच्या समाजामधील काही धर्मांतर करत तिकडील लाभ तर मिळवत आहेतच शिवाय इकडे मूळ आदिवासींच्या आरक्षणातून सरकारद्वारा मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि शासकीय योजनांचाही ते फायदा उठवत आहेत.
अशांना जनजातीच्या आरक्षण सुचीमधून बाहेर काढण्यात यावे आणि तसा कायदा व्हावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथील देवबाप्पाजी महाराज यांनी हिंदू धर्म, आदिवासी संस्कृती याबद्दल मार्गदर्शन केले. प्रांत सहसंयोजक ऍड.किरण गबाले यांनीही मनोगत व्यक्त केले. वनवासी परियोजना पश्चिम महाराष्ट्रचे प्रांतप्रमुख प्रदीप बच्छाव यांनी या संमेलनाचे संयोजन केले. भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, मंचचे प्रांत संयोजक पांडुरंग भांगरे, जिल्हा सहसंयोजक शंकर राऊत, विनायक सुरत्ने, वायबीएसचे संस्थापक रघु नवरे, गोविंदा सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विकी सोनवणे, सोमनाथ पवार, सागर पवार, अनिल ठाकरे, शरद गायकवाड, सुनील गांगुर्डे, काळू पवार, लखन पवार आदींसह इतर कार्यकर्त्यांनी संमेलन यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. युवराज लांडे यांनी सूत्रसंचालन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम