द्राक्ष बाग आच्छादनासाठी राज्य शासनाने अनुदान द्यावे

0
13

तुषार रौदळ

सटाणा प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील अर्ली द्राक्ष पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मागील तीन ते चार वर्षांपासून अवकाळी पाऊस व निसर्गाच्या लहरीपणामुळे हजारो हेक्टर वरील कोट्यवधी रुपयांच्या नुकसाणीस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या अर्ली द्राक्ष बागांवर क्रॉप कव्हर (आच्छादन) टाकण्यासाठी राज्य शासनाकडून सबसिडी मिळावी अशी मागणी माजी आमदार दिपिका चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

बागलाण तालुका हा अर्ली द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखला जातो. तसेच उत्कृष्ट उत्पादन घेणारा तालुका अशी देखील ओळख असलेल्या या तालुक्यात मागील तीन ते चार वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि निसर्गाच्या लहरीपणाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसुन हजारो हेक्टर वरील द्राक्ष बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील अर्ली द्राक्षांचे उत्पादन घेणारा द्राक्ष बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडुन मेटाकुटीला आला आहे.

तीन दिवसांपूर्वी तालुक्यात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने थैमान घातल्याने ऐन काढणीला आलेल्या द्राक्ष बागांसह कांदा, मका, गहु, हरभरा व भाजीपाला आदि पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी पुर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

बागलाण तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी दरवर्षी एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान होत असल्याने एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च करून ही एक रुपयाही हातात न पडता नुसती पदरी निराशाच येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे.

दरवर्षी द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी मोठ्या कष्ट घेतात, मोठा खर्च करतात, शेतीत विविध प्रयोग करून उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र ऐनवेळी अवकाळी पाऊस व निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसून पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या द्राक्ष बागा डोळ्यादेखत उद्ध्वस्त होतात आणि शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते होते.

बागलाण तालुक्यातील द्राक्ष उत्पादन घेणारा शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदतीचा हाथ देणे अत्यंत आवश्यक आहे. अवकाळी पाऊस, गारपीट व निसर्गाचा लहरीपणाचा अशा नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी बागांमध्ये द्राक्ष पिक तयार होत असतांना, द्राक्ष बागांवर क्रॉप कव्हर(आच्छादन)टाकण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव अनुदान मिळावे त्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना निर्देश देण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here