अंकुश सोनवणे
द पॉईंट नाऊ : मालेगावहून गुटखा घेऊन येणारा ट्रक मुंबई-आग्रा महामार्गावरील उमराणे उड्डाणपुलाजवळ पकडून तब्बल ७२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवारी (ता.१६) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईबद्दल देवळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राजस्थान राज्यातून मालेगावमार्गे एक ट्रक गुटखा घेऊन येत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार देवळा पोलीस ठाण्यातील बच्छाव, गांगुर्डे, क्षीरसागर, किरण पवार, भास्कर सोनवणे, नीलेश सावकार, सचिन भामरे, ज्योती गोसावी आदिंनी मुंबई-आग्रा महामार्गावरील उमराणे उड्डाणपुलाजवळ सापळा लावून दहाचाकी मालवाहू ट्रक (एचआर.३८, डब्ल्यू.७२३६) पकडला. त्याची तपासणी केली असता ५० गोण्यांमध्ये २७ लाख ७२ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू, ४४ गोण्यांमध्ये १७ लाख ६० हजार रुपयांचा पान मसाला, १९ गुलाबी गोण्यांत ९ लाख ५० हजार रुपयांची जाफराणी जर्दा, १० पांढऱ्या गोण्यांत ३ लाख ८ हजार रुपयांची जाफराणी जर्दा असा प्रतिबंधित माल आढळून आला. पोलिसांनी १५ लाख रुपयांचा ट्रकसह ७२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शोएबखन जैकम खान (वय २६, रा.जलालपूर) यास ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, प्रभारी पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार, सहा. पोलीस उपनिरीक्षक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम