देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत आज बुधवार (दि.८) रोजी नामनिर्देशन पत्र छाननीत तेरा प्रभागांतील ७४ उमेदवारी अर्जांपैकी ४८ अर्ज वैध तर २६ अवैध ठरले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सी.एच.देशमुख व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली.

त्यात प्रभाग १४ व १७ मधून प्रत्येकी दोन दोन अर्ज अवैध ठरल्याने या दोनही प्रभागात शिल्लक एकेकच उमेदवार राहिल्याने त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. सदर उमेदवार भाजपच्या गोटातील असल्याने येथे भारतीय जनता पक्षाकडून जल्लोष करण्यात आला.
देवळा नगरपंचायत निवडणुकीने आज पुन्हा नवीन वळण घेतले. १७ प्रभागांपैकी ओबीसींसाठी राखीव असलेल्या चार वॉर्डातील निवडणूक प्रक्रियेला आधीच स्थगिती मिळाल्याने १३ वॉर्डांसाठी ७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २६ अर्ज अवैध झाल्याने आता केवळ ४८ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. त्यात उमेदवारी अर्ज छाननी चालू असताना प्रभाग १४ व १७ प्रभागात प्रत्येकी तीन-तीन उमेदवारी अर्ज होते. परंतु या दोन्ही वॉर्डात प्रत्येकी दोन-दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने वॉर्ड १४ मध्ये संजय तानाजी आहेर व १७ मध्ये मनोज राजाराम आहेर यांची निवड निश्चित मानली जात आहे. उद्यापासून माघारी असून १३ डिसेंबर ही माघारीची अंतिम तारीख आहे. तोपर्यंत आणखी काय काय घडामोडी होतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम