देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायतीच्या उर्वरित चार प्रभागांसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार ( दि.३०) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर चार उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सि.एच.देशमुख यांनी दिली.

ओबीसी आरक्षणामुळे स्थगित झालेल्या व आता सर्वसाधारण जागांसाठी असलेल्या येथील चार प्रभागांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. यात प्रभाग चार व प्रभाग आठ हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून प्रभाग क्रमांक १० व १३ हे सर्वसाधारण आहेत.
यात प्रभाग ४ मधून योगिता सचिन सूर्यवंशी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ), प्रभाग ८ मधून जि प च्या माजी सदस्या भारती अशोक आहेर (भाजप व अपक्ष असे दोन ) तर प्रभाग १३ मधून देविदास कौतिक हिरे (अपक्ष) या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग १० मध्ये अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दि.३ पर्यंत असून शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने उर्वरित शुक्रवार व सोमवार या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी होणार आहे. मंगळवार दि.४ रोजी छाननी तर माघारीची तारीख १० जानेवारीला आहे.
यापूर्वी नगरपंचायतीच्या १३ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून आता उरलेल्या चार जागांसाठी सदर निवडणूक होत आहे. नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळा शहरात राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून पुढील रणनीती ठरविण्यासाठी राजकीय पक्षाच्या गुप्त बैठका घेतल्या जात असून यंदाची निवडणूक भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशीच असली तरी बंडखोरीची शक्यता असल्याने खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम