मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते आणि पूर्वीचे सहकारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गाण्यातून टीका केली आहे. “दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगी भर के लिये बदनाम किया है हया” गाण्यातून टीका केली आहे. त्यामुळे या दोन्ही आजी-माजी भाजपा नेत्यांमधला कलगीतुरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो आहे. झी मराठीच्या ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात त्यांनी हे टोले लगावले आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांना बोलावण्यात आले होते.
राजकीय कोडे आणि टोलेबाजी यामुळे कार्यक्रमात रंगत आली. दीड वर्षानंतर आपण आणि सोमय्या एकाच व्यासपीठावर आलो असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना राजकीय जीवनात आपली मोलाची मदत झाल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. “जेव्हा विधानमंडळात फडणवीस पाचव्या टेबलवर बसत होते, तेव्हा मीच त्यांना माझ्या मागच्या टेबलवर बसवण्यासाठी मदत केली. वारंवार त्यांना बोलण्याची संधी दिली.देवेंद्र फडणवीसांना मदत करण्याची भूमिका मी सातत्याने घेतली, असं एकनाथ खडसे म्हणाले.
खडसे म्हणाले, की मी किरीट सोमय्या यांना नेहमीच सल्ला देतो. सल्ला देण्याचा माझा अधिकार आहे, असे ते यावेळी म्हणाले. सोमय्या यांच्या सोबतची माझी मैत्री 30 वर्षांपासूनची आहे, असेही ते म्हणाले. “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांचं स्वागतच केलं. पण देवेंद्र फडणवीसांनी माझ्या चौकशा करणं, बदनाम करण्याचा प्रयत्न करणं, अंडरवर्ल्ड डॉनशी माझे संबंध जोडणं, दाऊदच्या बायकोशी माझं संभाषण दाखवणं, माझ्या पीएनं लाच घेतली, मी भूखंडात गैरव्यवहार केला असे खोटे आरोप केले. माझं तिकीट कापलं गेलं, माझी ईडीनं चौकशी केली अशा प्रकारे मला वारंवार छळण्याचा प्रकार यांच्या आशीर्वादाने झालेला दिसतोय”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम